अमेरिकेत राहणाऱ्या महिलेची नागपुरात आत्महत्या

By admin | Published: August 21, 2016 10:36 PM2016-08-21T22:36:55+5:302016-08-21T22:36:55+5:30

अमेरिकेत राहणाऱ्या एका उच्चशिक्षित महिलेने नातेवाईकांच्या घरी नागपुरात येऊन आत्महत्या केली.

A woman in the US suicides in Nagpur | अमेरिकेत राहणाऱ्या महिलेची नागपुरात आत्महत्या

अमेरिकेत राहणाऱ्या महिलेची नागपुरात आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 21 - अमेरिकेत राहणाऱ्या एका उच्चशिक्षित महिलेने नातेवाईकांच्या घरी नागपुरात येऊन आत्महत्या केली. स्वत:चा जीव देण्यापूर्वी तिने आपल्या आठ महिन्यांच्या गोंडस चिमुकल्यालाही विहिरीत फेकून त्याचा जीव घेतला. रविवारी सकाळी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. प्राजक्ता अतुल देशमुख (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, तिच्या हातून मारल्या गेलेल्या तिच्या चिमुकल्याचे नाव सर्व्हेश आहे. तिचे माहेर अमरावतीत आहे.
भंडाऱ्यातील अतुल भास्कर देशमुख (वय ३५) यांच्याशी तिचा विवाह झाला होता. नोकरीच्या निमित्ताने अतुल पत्नी आणि मुलगा सर्व्हेशसह अमेरिकेतील ट्रिचसिटीत (जागरिया स्टेट) राहत होते. रविवारी रात्रीपर्यंत या प्रकरणाचे कारण स्पष्ट न झाल्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी मृत प्राजक्ताविरुद्ध मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अतुल सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. तर, प्राजक्ताने एमबीए केले होते. अमेरिकेत ती हाऊस वाईफ म्हणूनच भूमिका वठवित होती. आठ महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्राजक्ता आणि अतुलने बाळाचे नाव सर्व्हेश ठेवले. अतुलची बहीण आणि जावई स्वामीधाम नगरी, बेसा, नागपूर येथे राहतात. राखी बांधून घेण्यासाठी अतुल पत्नी आणि मुलासह बहीण जावई राजेंद्र देशमुख यांच्याकडे आले होते. सर्व काही हसत खेळत झाल्यानंतर शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास प्राजक्ता घरगुती साहित्य घेऊन येते, असे सांगून चिमुकल्या सर्व्हेशला घेऊन घराबाहेर पडली. दुपार झाली तरी ती परतली नाही. तिचा मोबाईल घरीच होता. त्यामुळे तिची वाट बघण्याशिवाय कुटुंबीयांसमोर पर्याय नव्हता. दुपारचे ४ वाजले तरी प्राजक्ता परत आली नाही त्यामुळे पतीने तिच्या माहेरच्यांना तसेच अन्य नातेवाईकांना विचारणा केली. ती कुणाकडेच पोहचली नसल्याचे कळल्याने शोधाशोध सुरू केली. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे सायंकाळी अतुल आपल्या नातेवाईकांसह हुडकेश्वर ठाण्यात पोहचले. त्यांनी पत्नी प्राजक्ता मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी अन्य पोलीस ठाण्यात ही माहिती देऊन शोधाशोध सुरू केली. रात्रभर इकडे तिकडे विचारणा केल्यानंतर रविवारी सकाळी अतुल आणि त्यांचे नातेवाईक पुन्हा हुडकेश्वर ठाण्यात पोहचले. पोलिसांनी त्यांना आजूबाजूच्या विहिरीत शोधण्याचा सल्ला दिला.

... अन् काळजाचे ठोके चुकले
स्वामीधाम परिसरालगतच्या मैदानात एक विहिर आहे. देशमुख कुटुंबीयांनी सहजपणे विहिरीत डोकावले आणि त्यांच्या काळजाचे ठोके चुकले. प्राजक्ताचा मृतदेह विहिरीत तरंगत होता. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना केली. पीएसआय निलेश पुरभे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोहचले. माहिती कळाल्यानंतर ठाणेदार झावरे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री राठोड यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने प्राजक्ता आणि सर्व्हेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ते पाहून अतुल आणि त्यांच्या कुटुंबीयांना जबर मानसिक आघात बसला. कारण अंधारात या विहिरीवर जाळी आहे. त्यामुळे एकाचवेळी दोघांनी वरून उडी घेणे शक्य नाही. त्यामुळे प्राजक्ताने आधी चिमुकल्या सर्व्हेशला विहिरीत फेकले आणि नंतर स्वत: उडी घेतली असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला आहे. मात्र घरात सर्व व्यवस्थीत असूनही तिने गोंडस चिमुकल्यासह स्वत:ला संपविण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले त्याचे कारण स्पष्ट झाले नाही. सध्याच कोणती सुसाईड नोटही सापडली नसल्याचे पोलीस सांगतात. त्यामुळे पोलिसांनी प्राजक्तावर सर्व्हेशची हत्या करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A woman in the US suicides in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.