कार अडवल्याने महिलेने लगावली वाहतूक पोलिसाच्या श्रीमुखात
By admin | Published: January 7, 2017 02:47 AM2017-01-07T02:47:26+5:302017-01-07T02:47:26+5:30
कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री महापे येथे घडला.
नवी मुंबई : कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री महापे येथे घडला. रस्त्याच्या कामामुळे वाहनांना प्रवेशबंदी असतानाही त्या ठिकाणावरून जाणारी कार अडवल्याने त्यामधील महिलेने वाहतूक पोलिसाच्या श्रीमुखात लगावली होती. त्यानंतर सोबतच्या पुरुषानेही पोलिसाला धक्काबुक्की करत, त्याच्या कामकाजात अडथळा निर्माण केला होता.
ठाणे-बेलापूर मार्गावर ‘लोकमत’ प्रेस लगतच्या महापे मार्गावर हा प्रकार घडला. सदर मार्गावर काम सुरू असल्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गाकडून एमबीपीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यानुसार त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस प्रीतेश भातुसे हे त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. या वेळी एक कार (एमएच ०५ सीएच २९५३) प्रवेशबंदीच्या ठिकाणाहून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी कार थांबवून सदर मार्गावर प्रवेशबंदी असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही कारचालक कार पुढे नेऊ लागल्यामुळे भातुसे यांनी त्यांची कार बंद केली. याचा राग आल्यामुळे कारमधील महिलेने खाली उतरून भातुसे यांच्या श्रीमुखात लगावली. या वेळी भातुसे यांनी त्या सरकारी कामात अडथळा आणत असल्याचा समजही दिला. तर हा प्रकार पाहून काही अंतरावरील इतर वाहतूक पोलीसही त्या ठिकाणी आले. त्यांनीही सदर महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, कारचालक पुरुषानेही खाली उतरून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच तुर्भे गावातील मुलांच्या नावाची धमकीही त्यांना दिली.
त्यानुसार घडलेल्या प्रकाराची तक्रार भातुसे यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडे केली असून, सोपान आव्हाड (२६) व सपना पाटील (२९) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, जामिनावर त्यांची सुटका झाली आहे. दरम्यान, घडलेल्या या प्रकाराचा संताप वाहतूक पोलिसांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)