उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
By admin | Published: April 6, 2017 02:31 AM2017-04-06T02:31:44+5:302017-04-06T02:31:44+5:30
उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेच्या मृत्यूने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाला घेराव घातला होता.
नवी मुंबई : उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेच्या मृत्यूने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाला घेराव घातला होता. यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, तर सदर मृत महिलेवर झालेल्या उपचाराची तज्ज्ञांमार्फत चौकशी करून तिच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे.
बुधवारी सकाळी नेरूळ सेक्टर ८ येथील नेरूळ रुग्णालयात हा प्रकार घडला. सेक्टर ६ येथे राहणाऱ्या छाया शिंदे (४२) यांना सोमवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधार जाणवत होता. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे छाया शिंदे यांच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. याप्रकरणी त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरत जमाव जमवला होता. तसेच मृतदेह ताब्यात न घेता तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यास देखील नकार दिला. याची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु पोलिसांनी विनंती करूनही संध्याकाळपर्यंत नातेवाइकांनी मृतदेह अडवून धरला होता. अखेर संध्याकाळी नातेवाइकांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवण्यास अनुमती दिली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
नातेवाइकांच्या आरोपानुसार मयत छाया यांच्यावर झालेल्या उपचाराची तज्ज्ञांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. परंतु रुग्णालयाचे डॉक्टर अजित अन्सारी यांनी छाया यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
तसेच मयत महिलेच्या नातेवाइकांचे आरोपही फेटाळले आहेत. (प्रतिनिधी)