उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2016 02:44 AM2016-08-03T02:44:24+5:302016-08-03T02:44:24+5:30
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली
कळंबोली : दातावरील उपचारांसाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी नाराजी
व्यक्त करत संबंधित डॉक्टरवर
गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पुष्पा अमरिषचंद पांडे (५५) बिहार, वाराणसी येथील रहिवासी असून भाच्याच्या लग्नाकरिता वाराणसी येथून कळंबोलीत आल्या होत्या. कळंबोली येथे शांती विहार सेक्टर १६ येथे आपल्या मुलीकडे पुष्पा या वीस दिवसांपासून राहत होत्या. सोमवारपासून पुष्पा यांच्या दातात दुखू लागल्याने मुलीसोबत मंगळवारी साडे दहाच्या सुमारास उपचाराकरिता एमजीएम रु ग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टर तपासणीअंती दात काढावा लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी पुष्पा पांडे व त्यांच्या मुलीला देण्यात आला. पुष्पा पांडे व त्यांच्या मुलीच्या संमतीनुसार दात काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला.
डॉक्टरने आपल्याकडून झालेल्या हालगर्जीपणाची सारवासारव केली. दात काढतेवेळी रुग्ण दगावल्याची माहिती पुष्पा यांच्या नातेवाइकांना देण्यात आली. सर्व घटनेस डॉक्टर जबाबदार असल्याचे व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमची आई दगावल्याची भावना पुष्पा पांडे यांच्या मुलीने व्यक्त केला आहे.
रुग्णाची तब्येत ठीक नसल्याने उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली. तर या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुष्पा पांडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच कळेल. यासाठीचा तपास चालू असून तपासाअंतीच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोपेरे यांनी सांगितले. (वार्ताहर)