ट्रस्टमधून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेची 21 लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 03:37 PM2017-12-03T15:37:06+5:302017-12-03T15:37:21+5:30
ठाणे: मामा भांजे दर्गा ट्रस्टचा विश्वस्त असल्याची बतावणी करीत मामा भांजे ट्रस्ट आणि बारामती ट्रस्ट यांच्याकडून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या मानपाडा येथील महिलेची 21 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
ठाणे: मामा भांजे दर्गा ट्रस्टचा विश्वस्त असल्याची बतावणी करीत मामा भांजे ट्रस्ट आणि बारामती ट्रस्ट यांच्याकडून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या मानपाडा येथील महिलेची 21 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
महमद सलीम खान कुलाबावाला याने या 45 वर्षीय महिलेला आपण मामा भांजे दरगाह ट्रस्टमध्ये विश्वस्त असल्याचे भासविले. त्यामुळेच मामा भांजे ट्रस्ट आणि बारामती ट्रस्टमार्फत सहज बिनव्याजी कर्ज मिळवून देऊ शकतो, अशी त्यांना गळ घातली. त्यासाठी लागणारी प्रोसेसिंग, गॅरेंटर, पडताळणी तसेच इनव्हिजिलेटर फीच्या नावाखाली वेळोवेळी सलीम खान त्याचा मित्र जयदीप गोखले, शिरीष अय्यर, संजय चव्हाण, प्रमोद आणि शोभा यांनी ही महिला आणि तिचा भाऊ रमेश यांच्याकडून बँकेतून आरटीजीएसद्वारे तसेच रोखीने 21 लाखांची रक्कम घेतली. त्याबदल्यात संबंधित महिलेचे कोणत्याही प्रकारचे कर्जही त्यांनी मंजूर करून दिले नाही.
एप्रिल 2015 ते 2 डिसेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये ही महिला आणि तिच्या भावाकडून सलीम आणि त्याच्या साथीदारांनी हे 21 लाख रुपये उकळले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वारंवार त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. मात्र, त्यांनी पैसे किंवा कर्जही दिले नाही. अखेर याप्रकरणी 2 डिसेंबर रोजी त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अशोक सायकर हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्यामुळे अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.