बँकेतून पैसे मिळत नसल्याच्या विवंचनेतून महिलेची आत्महत्या
By Admin | Published: January 5, 2017 09:39 PM2017-01-05T21:39:51+5:302017-01-05T21:39:51+5:30
कलमाडी, ता.नंदुरबार येथील महिलेने मुलाच्या लग्नासाठी बडोदा बँकेच्या खात्यातून पैसे मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली.
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 5 - कलमाडी, ता.नंदुरबार येथील महिलेने मुलाच्या लग्नासाठी बडोदा बँकेच्या खात्यातून पैसे मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. दरम्यान, बडोदा बँकेच्या व्यवस्थापकांनी या आरोपाचे खंडन केले आहे. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कलमाडी येथील मालुबाई मोतिलाल पाटील (५५) या महिलेने गावालगतच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सकाळी ही बाब निदर्शनास आली. मालुबाई पाटील यांच्या मोठ्या मुलाचे लग्न ठरले होते. त्यासाठी पाटील कुटुंबाला पैशांची अडचण होती. मोतिलाल पाटील यांचे बडोदा बँकेच्या नंदुरबार शाखेत बचत खाते आहे. त्या खात्यातून पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केली. जिल्हा रुग्णालयात देखील नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक शिवाजी गावीत, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, शहरचे वाघमारे यांनी नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर पाच जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. तेथे कैफियत मांडण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी नातेवाईकांची समजूत घातली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याशीही बोलणे करून दिले. रावल यांनी संबधितांवर कारवाईचे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. नातेवाईकांचे समाधान झाल्यानंतर सायंकाळी उशीरा मालुबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत भूता पुंडलि्क पाटील यांनी तालुका पोलिसात खबर दिल्याने नोंद करण्यात आली आहे.