अपहरण झालेली महिला पोलीस पुण्यात सापडली
By admin | Published: January 10, 2016 01:30 AM2016-01-10T01:30:24+5:302016-01-10T01:30:24+5:30
बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अपहृत महिला पोलीस आणि तिचा पती हे दोघे पुण्यात सापडले. सध्या ते दहिसर पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस या जोडप्याचा जबाब नोंदवून घेत आहेत.
मुंबई : बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अपहृत महिला पोलीस आणि तिचा पती हे दोघे पुण्यात सापडले. सध्या ते दहिसर पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस या जोडप्याचा जबाब नोंदवून घेत आहेत.
सहकारी पोलीस कर्मचाऱ्याकडून धोका असल्याचा दावा केल्याने पोलीस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचारी सुनीता कोंडवलकर (३०) आणि तिचा पती किरण (३५) यांचे दहिसरमधून अपहरण करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराचा संदेशदेखील रेल्वे पोलिसांच्या बोरीवली विभागाला मिळाला होता. त्यानुसार बोरीवली रेल्वे पोलीस तसेच दहिसर पोलीस या जोडप्याचा शोध घेत होते.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनाही पुण्यामधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्या दोघांचा जबाब नोंदविण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती या विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उत्तम खैरमोडे यांनी दिली. सुरुवातीला अपहरणाबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार देत जे काही सांगू ते रेल्वे पोलीस आयुक्तांनाच सांगू, असे उत्तर दहिसर पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या जबाबानंतर त्यांच्या अपहरणाचे गूढ उकलता येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.