"शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो, ही खेदाची बाब", सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:57 PM2023-03-31T12:57:51+5:302023-03-31T13:17:49+5:30

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Women are insulted in Maharashtra of Chhatrapati Shivaji Maharaj, it is a matter of regret, Supriya Sule expressed displeasure | "शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो, ही खेदाची बाब", सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी

"शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो, ही खेदाची बाब", सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी

googlenewsNext

मुंबई : हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली. त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. 

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे. अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत.  राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हटले आहे. 

याचबरोबर, महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य असेल तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? असा सवाल करतानाच त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंग अथवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Web Title: Women are insulted in Maharashtra of Chhatrapati Shivaji Maharaj, it is a matter of regret, Supriya Sule expressed displeasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.