महिलांनाही आकाश खुले!
By Admin | Published: October 9, 2016 01:52 AM2016-10-09T01:52:51+5:302016-10-09T01:52:51+5:30
श्रद्धा पाटील, द मेंटॉरप्रेन्युअर या स्टार्ट अपच्या सह संस्थापक आहेत. स्टार्ट अप्स उद्योजकांना व्यावसायिक यशासाठी इंडस्ट्रीतील तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून त्या मार्गदर्शन
- कुणाल गडहिरे
श्रद्धा पाटील, द मेंटॉरप्रेन्युअर या स्टार्ट अपच्या सह संस्थापक आहेत. स्टार्ट अप्स उद्योजकांना व्यावसायिक यशासाठी इंडस्ट्रीतील तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून त्या मार्गदर्शन करतात. महाविद्यालयीन तरुणांना स्टार्ट अप विषयात मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची संस्था विशेष प्रयत्न करते. स्टार्ट अप्स इको सिस्टममध्ये महिलांचं स्थान, त्यांना येत असलेल्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
१) सध्या जेवढे स्टार्ट अप्स सुरू झाले आहेत त्यात महिलांचं प्रमाण ९ टक्के आहे. महिलांचं प्रमाण इतकं कमी का?
- याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे, भारतात लहानपणापासूनच स्त्रियांना नेतृत्वगुण शिकवले जात नाहीत. घरांमध्ये स्त्रियांना एकूणच निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान दिलं जात नाही. त्यामुळे त्यांच्यात तशी मानसिकता तयारच होत नाही. स्टार्ट अप हा विषय आव्हानात्मक आहे. त्यामुळे आव्हानं स्वीकारण्यासाठी योग्य मानसिकता घडवली जात नसल्याने अनेक स्त्रिया स्वत:चा उद्योग सुरू करण्यापेक्षा, त्याच्या तुलनेत नोकरीचा सुरक्षित पर्याय स्वीकारताना दिसतात. पण, आता ही परिस्थिती बदलत आहे. भारतातील स्टार्ट अप विश्वातील सर्वांत मान्यवर आणि अग्रगण्य पोर्टल ‘युअरस्टोरी डॉट कॉम’ हे एका महिलेनेच सुरू केलं आहे.
२) स्टार्ट अप विश्वात गुंतवणूकदारांकडून स्त्री - पुरुष असा भेदभाव होतोे का ?
सरसकट पूर्णपणे भेदभाव होत आहे असं निश्चितच म्हणता येणार नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की स्टार्ट अप्सची गणितं ही वेगळी आहेत. गुंतवणूकदार स्टार्ट अप्समध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून गुंतवणूक करतात. पुरुष अथवा स्त्री या भेदभावापेक्षा, गुंतवणुकीवर आपल्याला किती फायदा मिळू शकतो, संस्थापकांकडे ते स्टार्ट अप व्यावसायिकरीत्या चालवण्याची क्षमता आहे किंवा नाही, स्टार्ट अप किती मोठ्या प्रमाणात यश संपादित करू शकतील हे निकष जास्त महत्त्वाचे ठरतात. काहीवेळा कौटुंबिक जबाबदारी, प्रेग्नन्सी अशा कारणांमुळे महिलांना थोड्या काळासाठी पूर्ण वेळ लक्ष देणं शक्य होत नाही. हा विचार गुंतवणूकदार करू शकतात. मात्र यासाठी स्त्रियांनी आपल्यासोबत योग्य सहसंस्थापक घेतले तर त्याची मदत होऊ शकते. चिक्स कनेक्ट, इंजिनीअर बाबू या महिला संस्थापक असलेल्या स्टार्ट अप्सना नुकतीच गुंतवणूक मिळाली आहे. अशी अनेक उदाहरणं आज आहेत. व्यावसायिक यशासाठी व्यावसायिक समीकरणांचा स्त्रियांना विचार करावा लागेल.
३) महिला उद्योजिकांना यासाठी प्रोत्साहन देण्यात सरकारी पातळीवर विशेष असे कोणते प्रयत्न होत आहेत का?
- काही प्रमाणात फंडिंगच्या योजना महिलांसाठी आहेत. परंतु त्या योजना गांभीर्याने राबविल्या जाताना दिसत नाही. स्टार्ट अप्समधील महिलांचं प्रमाण वाढविण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर जास्तीतजास्त प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्त्रिया स्वत:च्या उद्योगाचा विचार करतील. शिरोजसारख्या विविध स्टार्ट अप्सच्या माध्यमांतून खाजगी स्तरावर सध्या अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. अनेक इन्क्युबेटर संस्थादेखील महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना संधी उपलब्ध करून देत आहेत. महिलांच्या समस्या या वेगळ्या असतात. त्यामुळे महिलांकडून महिलांसाठी अशा प्रकारचे आणखी उपक्रम सुरू होण्याची गरज आहे. म्हणूनच द मेंटॉरप्रेन्युअरच्या माध्यमातून आम्ही फक्त महिलांसाठी विशेष स्टार्ट अप अॅसलरेटर प्रोग्रामची सुरुवात करीत आहोत.
४) टेक्नॉलॉजी, आॅन डिमांड सर्व्हिस, गेमिंग यांसारख्या सेक्टरमध्ये महिला स्टार्ट अप्सची संख्या फॅशन किंवा फूड किंवा वेब पोर्टल्सपेक्षा तुलनेने कमी आहे. यामागे नेमकं कारण काय?
- लहानपणापासून स्त्रिया आणि टेक्नॉलॉजी हे समीकरण शक्य नाही ही गोष्ट मनावर बिंबवली जाते. याबद्दलची स्त्रियांची मानसिकता घडवली पाहिजे. यासाठी शैक्षणिक स्तरावरच प्रयत्न केले पाहिजेत. टेक्नॉलॉजी क्षेत्रातील रोल मॉडेल्स त्यांच्यासमोर आणल्या पाहिजेत. स्त्रियासुद्धा टेक्नॉलॉजी क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात हा विश्वास त्यांच्यात निर्माण केला पाहिजे. विशेष करून इंजिनीअरिंग किंवा तत्सम टेक्नॉलॉजी विषयातील शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना यासाठी योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे.
५) महिलांना पुढे आणण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी काय करता येईल?
केवळ पुरुष अथवा स्त्री वर्गाची मानसिकता बदलून चालणार नाही. संपूर्ण समाजाचीच मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सर्वांत आधी तर महिलांनी स्वत:साठी, स्वत:च निर्णायक भूमिका घ्यायला हवी. स्वत:ला काही करायचं असेल तर स्वत:साठी तशी सकारात्मक परिस्थिती बनवली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी स्ट्रगल हा करावाच लागेल; आणि तो केला तर यश नक्की मिळेल.
६) स्टार्ट अप सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना काय सल्ला द्याल?
अपयशाने खचून जाऊ नका. सतत प्रयत्न करा. तुम्हाला एखाद्या गोष्टीची मदत हवी असेल तर न लाजता संबंधित तज्ज्ञ व्यक्तींना विचारा. कोणी टीका केली तर त्यावर विचार करा. इतर उद्योजकांसोबत एकमेकांच्या मदतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आव्हानं स्वीकारा. त्यासाठी जास्तीतजास्त शिकण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबीयांना विश्वासात घ्या. त्यांना तुमच्या बिझनेसच्या सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगा.
७) द मेंटॉरप्रेन्युअर कशा प्रकारे काम करते?
कोणत्याही उद्योगासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शनासाठी तितक्याच अनुभवी आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींची नवीन उद्योजकांना गरज आहे. आम्ही एकंदरीत उद्योजकांना त्यांना त्यांच्या बिझनेससाठी योग्य मार्गदर्शकांशी जोडण्याचं काम करीत आहोत. स्टार्ट अप्सना अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना व्यावसायिक गुंतवणूकदारांचीसुद्धा कदाचित गरज भासणार नाही. सध्या आम्ही १२ स्टार्ट अप्सना मार्गदर्शन करतो आहोत. याशिवाय आम्ही संपूर्ण भारतभर महाविद्यालयीन स्तरावर उद्योजकीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत आहोत. ज्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी त्यांचं स्वत:च स्टार्ट अप चालू करू शकतील. महिलांसाठीसुद्धा आम्ही विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमांचं आयोजन करीत आहोत.