अवैध दारू विक्रेत्यावर महिलांचा हल्ला
By admin | Published: January 7, 2015 12:57 AM2015-01-07T00:57:02+5:302015-01-07T00:57:02+5:30
तालुक्यातील विसापूर येथे मंगळवारी एका महिलेच्या अवैध दारू दुकानावर संतप्त महिलांनी हल्लाबोल करीत चक्क तिला उचलून पोलीस चौकीत नेले. ही घटना दुपारी १.३० वाजता दरम्यान घडली.
विसापूर येथील घटना : खोली खाली करण्यावरुन उफाळला वाद
बल्लारपूर (चंद्रपूर) : तालुक्यातील विसापूर येथे मंगळवारी एका महिलेच्या अवैध दारू दुकानावर संतप्त महिलांनी हल्लाबोल करीत चक्क तिला उचलून पोलीस चौकीत नेले. ही घटना दुपारी १.३० वाजता दरम्यान घडली. विसापूर येथील खजांची आडे नामक इसमाची खोली सदर महिलेनी तीन वर्षापूर्वी हॉटेल व्यवसाय थाटण्याच्या उद्देशाने भाड्याने घेतली. मात्र काही दिवसातच त्या ठिकाणी अवैध दारू विक्रीला सुरुवात केली. ऐन वर्दळीच्या मार्गावर व्यवसाय सुरू होता. पोलीस प्रशासनाला न जुमानता येथे अवैध दारू विक्री होत होती. दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वी घरमालकाने खोली खाली करून देण्यास विनंती केली. मात्र सदर महिलेने दाद दिली नाही. सोमवारला घरमालकाने खोलीला कुलूप लावून ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने कुलूप तोडून स्वत:च्या १०-१२ वर्षाच्या मुलीला त्याच खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले. अखेर येथील दीडशेवर जमा झालेल्या महिलांचा संयम सुटला आणि जमावाने तिला उचलून पोलीस चौकीत नेले. महिलांचे रौद्ररूप पाहून येथील चौकीचे जमादार धर्मेंद्र रामटेके यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली.
पोलिसांनी कोंडून ठेवलेल्या मुलीला बाहेर काढले. तद्नंतर सदर अवैध दारू विक्रेता महिला व आंदोलनकर्त्या महिलांमध्ये समेट घडवून आणण्यात आल्याची माहिती आहे. प्राप्त स्थितीत वादग्रस्त खोलीचा ताबा सरपंचाकडे आहे. येथील अवैध दारू विक्रीला लगाम लावण्यासाठी महिलांनी पोलिसांना दोन अडीच तास वेठीस धरले. (प्रतिनिधी)