महिलांनो निर्भय बना, शालिनी ठाकरे यांचा डॉ. राणी बंग यांच्याशी मुक्त संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 09:44 PM2021-03-08T21:44:01+5:302021-03-08T21:45:15+5:30
जगातील प्रतिष्ठीत अशा ‘लँन्सेंट’ या मेडिकल जर्नलने नुकताच डॉ. राणी बंग यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक खास लेख प्रकाशित केला होता.
मुंबई – “एखाद्या महिलेवर जर बलात्कारासारखा दुर्दैवी प्रसंग ओढवला तरी तिने खचून न जाता, या प्रसंगाला सामोरं जायला हवं. कुणी तुमच्या शरीरावर बलात्कार करू शकतं, पण तुमचं मन जर पवित्र असेल तर कुणाचीही फिकीर करण्याची गरज नाही. अशा शब्दात आज जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. राणी बंग (Dr. Rani Banga) यांनी महिलांना ‘निर्भय बना’ असा संदेश दिला आहे. त्या कल्की फाऊंडेशनच्या संस्थापिका तथा मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांच्याशी मुक्त संवाद साधताना बोलत होत्या. (Women be fearless, Shalini Thackeray Free dialogue with Dr. Rani Banga)
जगातील प्रतिष्ठीत अशा ‘लँन्सेंट’ या मेडिकल जर्नलने नुकताच डॉ. राणी बंग यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक खास लेख प्रकाशित केला होता. कोणत्याही महिलेला अभिमानास्पद वाटेल, अशी ही कामगिरी असल्याने ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने शालिनी ठाकरे यांनी डॉ. राणी बंग यांच्याशी मुक्त संवाद साधला.त्यांच्या ‘वीरांगना’ या नवीन यु ट्यूब चॅनलवरील पहिल्या पाहुण्या म्हणून त्यांनी डॉ. राणी बंग यांना खास आमंत्रित केले होते.
या मुक्त संवादात डॉ. राणी बंग यांनी जॉन हॉपकिन्स इन्स्टीट्यूटमध्ये शिक्षण घेऊनही पुन्हा भारतात येण्याचा निर्णय नक्की का घेतला..? गडचिरोलीमध्ये येऊन नक्की कसं काम केलं..? यासोबतच महिलांच्या गायनिक प्रश्नांबाबत संशोधन करताना कोणत्या बाबी त्यांना आढळल्या याबाबत ठाकरे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. याशिवाय कोरोनासारख्या रोगांना आळा घालण्यासाठी नक्की काय करावं लागेल, महिला अत्याचारांची वाढत असलेली संख्या कमी करण्यासाठी महिलांना त्यांचे विचार कसे बदलावे लागतील. सॅनिटरी पॅड्सचा वापर आणि त्या निमित्ताने स्त्रीयांच्या आरोग्याबाबतची त्यांना जाणवणारी निरिक्षणं, तरूणाईपुढे वाढत चाललेला पॉर्नोग्राफीचा विळखा, त्याचे समाजावर होणारे गंभीर परिणाम यांसारख्या एरवी चर्चेत नसलेल्या विषयांवर त्यांनी आपली मते मांडली.
“जागतिक महिला दिन म्हटला की महिलांचा सन्मान करणारी सोशल मीडिया पोस्ट टाकणे, घरातील आपल्या प्रिय व्यक्तीसोबतचा फोटो पोस्ट करणे किंवा समाजातील कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान करणे एवढेच कार्यक्रम करण्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन यंदा महिलांसमोर वेगळा विचार मांडायचा प्रयत्न आपण केला असल्याचं शालिनी ठाकरे यांनी लोकमतला सांगितले. महिला सबलीकरणाचा जो उद्देश ठेवून ‘कलकी फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली होती, तोच उद्देश अजून पुढे घेऊन जाण्यासाठी हा उपक्रम अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.