मशिदींमध्ये महिलाही नमाज अदा करु शकतात, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची न्यायालयाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:02 AM2023-02-10T10:02:04+5:302023-02-10T10:03:09+5:30
पुण्यातील एका वकिलाने मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेशबंदी बेकायदेशीर घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे. अशा प्रकारच्या निर्बंधाची कल्पना कुराणमध्येदेखील केली गेली नव्हती, असा युक्तिवाद यात केला आहे.
डॉ. खुशालचंद बाहेती -
मुंबई : इस्लाममध्येमहिलांना नमाज किंवा सामूहिक नमाज अदा करण्यासाठी मशिदींमध्ये प्रवेश करण्यास मनाई नाही. परंतु स्त्री-पुरुष एकत्र येत नमाज अदा करू शकत नाहीत, अशी माहिती ऑल-इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. मुस्लिम वैयक्तिक कायदा किंवा शरियतच्या संरक्षणासाठी सरकारांशी संपर्क साधणारी एआयएमपीएलबी ही एक संस्था आहे.
कुणाची याचिका -
पुण्यातील एका वकिलाने मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेशबंदी बेकायदेशीर घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे. अशा प्रकारच्या निर्बंधाची कल्पना कुराणमध्येदेखील केली गेली नव्हती, असा युक्तिवाद यात केला आहे.
एआयएमपीएलबीने आपली भूमिका स्पष्ट केली की, मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश करण्यास व नमाज किंवा सामूहिक प्रार्थना करण्यास मनाई नाही. तथापि, समान ओळीत किंवा समान जागेत स्त्री-पुरुषांचे मुक्त मिश्रण इस्लामशी सुसंगत नाही.
प्रतिज्ञापत्रातील मुद्दे -
- मुस्लिम महिलांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जाण्यास मनाई नाही.
- मुस्लिम महिलांना इस्लामिक कायद्यानुसार दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे बंधनकारक नाही.
- मुस्लिम महिलांनी शुक्रवारच्या दिवशी साप्ताहिक नमाज अदा करावी, असा कोणताही धार्मिक आदेश नाही.
- मुस्लिम स्त्रीला वेगळे स्थान दिले जाते. कारण इस्लामच्या सिद्धांतानुसार तिने घरी किंवा मशिदीत नमाज अदा केली तरी समान धार्मिक बक्षीस, म्हणजे सवाबची पात्र आहे.
- इस्लामनुसार मशिदींमध्ये स्त्री-पुरुष एकत्र येण्याची परवानगी नाही.. मक्केत एकत्र केले जाणारे विधी नियमित प्रार्थनेपेक्षा वेगळे आहेत.