पुण्यात शस्त्रतस्करी करणारी महिला गजाआड

By admin | Published: August 26, 2016 07:37 PM2016-08-26T19:37:34+5:302016-08-26T19:37:34+5:30

शहरातील वाढत्या अग्निशस्त्र तस्करीसाठी आता महिलांचाही वापर करण्यात येऊ लागला असून मध्यप्रदेशामधून तीन पिस्तूलं आणि 21 जिवंत काडतुसे घेऊन आलेल्या

Women carrying arms in Pune | पुण्यात शस्त्रतस्करी करणारी महिला गजाआड

पुण्यात शस्त्रतस्करी करणारी महिला गजाआड

Next
ऑनलाइन लोकमत
 
पुणे, दि. 26 -  शहरातील वाढत्या अग्निशस्त्र तस्करीसाठी आता महिलांचाही वापर करण्यात येऊ लागला असून मध्यप्रदेशामधून तीन पिस्तूलं आणि 21 जिवंत काडतुसे घेऊन आलेल्या महिलेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. महिलेकडून शस्त्र तस्करी उघड होण्याची ही पहिलीच वेळ असून दरोडा प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी लष्कर भागातील हॉटेल अरोरासमोर ही कारवाई केल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. 
जेनीबाई ताना बारेला (वय 50, रा. उमेटी, बडवानी, मध्यप्रदेश) असे अटक महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना जेनीबाई मध्यप्रदेशामधून शस्त्र घेऊन पुण्यामध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लष्कर भागातील अरोरा टॉवर समोर सापळा लावला. घागरा चोली असा पेहराव तिने केलेला असल्याची माहिती पोलिसांकडे होती. उपलब्ध वर्णानुसार दिसणा-या जेनाबाईला ताब्यात घेऊन चौकशी केली. 
तिच्याकडील कापडी बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण देशी बनावटीची तीन पिस्तूले आणि 21 जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 9 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. तिच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली असून मध्यप्रदेशातील दर्पण ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने ती पुण्यात आली होती. सोबत येताना तीने ही शस्त्रे छातीच्यावर कापडात लपेटून अंगावर शॉल ओढून प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे. ती नेमकी कोणाला शस्त्र विकणार होती याचा तपास सुरु असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. 
 
गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शैलेश जगताप यांनी गेल्या 21 वर्षांच्या सेवेमध्ये बेकायदा शस्त्र पकडून देण्याचा उच्चांक केला आहे. आजवरच्या सेवेमध्ये त्यांनी एकूण 155 बेकायदा शस्त्र जप्त केली आहेत. त्यांच्यावर यापुर्वी दोन वेळा गुन्हेगारांनी गोळीबार केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.
 
कशी आहे पद्धत?
पुण्यातील ग्राहकांनी मध्यप्रदेशातील मुख्य डीलरशी संपर्क साधल्यावर त्यांना जेवढी शस्त्रे हवी असतील त्याचे पैसे त्याच्या खात्यामध्ये भरायला सांगितले जातात. त्यानंतर पैसे जमा झाल्याची खात्री करुन ती शस्त्रे जेनीबाईकडे सुपुर्द केली जातात. जेनीबाई खासगी ट्रॅव्हल्सने पुण्यामध्ये शिवाजीनगर बस स्थानक भागात येते. तेथे ग्राहकाला शस्त्र देऊन तेथूनच परत निघून जाते.
 
कोण आहे जेनीबाई?
जेनीबाई बारेला ही मुळची मध्यप्रदेशातीलच रहीवासी आहे. तिचे लग्न झालेले असून तिच्या पतीचे निधन झालेले आहे. तिचा मुलगाही बेकायदा शस्त्र निर्मितीच्याच व्यवसायामध्ये आहे. गेल्या वर्षभरापासून तिने पुण्यात तीन ते चार वेळा येऊन काही जणांना शस्त्र विकलेली आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. पुण्यासोबतच मुंबई आणि नाशिकमध्येही जेनीबाईने मोठ्या प्रमाणावर शस्त्र विक्री केल्याचे समोर आले आहे. तिला यापुर्वी बेकायदा शस्त्र तस्करीप्रकरणी शिक्षा झालेली असून ती काही काळ आग्रा कारागृहात बंदीस्त होती.

 

Web Title: Women carrying arms in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.