महिला कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरण, मुंबईच्या पोलीस शिपायाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 10:50 PM2017-09-28T22:50:16+5:302017-09-28T22:50:25+5:30
महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल २२ दिवसांच्या चौकशीनंतर यातील सह आरोपी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे याला अखेर कळवा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.
ठाणे : महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल २२ दिवसांच्या चौकशीनंतर यातील सह आरोपी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे याला अखेर कळवा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
या आत्महत्येच्या घटनेनंतर मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे हे पसार झाले आहेत. तर फापाळे याची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. त्याची तपास अधिका-यांकडून हजेरीही घेण्यात येत होती. सुभद्राचे दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने अमोल याच्यासोबत लग्न ठरले होते. ते येत्या दिवाळीमध्ये विवाहबद्ध होणार होते. त्याच संदर्भातील बोलणी करायची असल्यामुळे ६ सप्टेंबर २०१७ रोजी दोघेही जेवणासाठी तिच्या कळवा, मनीषानगर येथील घरी एकत्र बसले असतानाच निपुंगे यांचे तिच्या मोबाईलवर वारंवार फोन येत होते.
वारंवार येणा-या फोनची चौकशी केल्यानंतर सुभद्राने निपुंगे यांच्याकडून होणा-या त्रासाची अमोल याला माहिती दिली. यातूनच त्यांच्यातही काहीतरी बिनसले. वादही झाला. तिच्या आत्महत्येला एसीपींच्या मानसिक छळाबरोबरच अमोलच्या वादाचीही किनार असल्याचा जबाब तिचा नवी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल भाऊ सुजीत पवार याने कळवा पोलिसांकडे नोंदविला. याच जबाबाच्या आधारे निपुंगे आणि फापाळे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. यातील मुख्य आरोपी निपुंगेंचा अटकपूर्व जामीन २५ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी फेटाळला. ते गेल्या २२ दिवसांपासून तपास पथकाला गुंगारा देत आहेत. तर सहआरोपी फापाळे याने सुरुवातीपासूनच पोलिसांना तपासामध्ये सहकार्याची भूमिका बजावली. परंतु त्याला अटक केलेली नव्हती. मात्र, आता त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.