दुष्काळी भागातील महिला, बालकांना गंभीर आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:15 AM2019-05-21T06:15:22+5:302019-05-21T06:15:25+5:30
गर्भपाताच्या प्रमाणात वाढ, राष्टÑवादीची कार्यवाहीसाठी महिला आयोगाकडे मागणी
मुंबई : दुष्काळी भागातील महिलांना पाणी भरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले; शिवाय काही महिलांचा मृत्यूही झाला आहे. त्यांना गर्भपात, कंबरदुखीसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. याची जबाबदारी राज्य सरकारची असून त्यांना कार्यवाही करण्यासाठी तातडीने सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी केली आहे.
महिला आयोगाकडे शिष्टमंडळासह सचिव मंजुषा मोळवणे यांनी हे मागण्यांचे निवेदन दिले. तसेच अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून विषयाची दाहकता निदर्शनास आणली. चित्रा वाघ यांनी नुकत्याच सोलापूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामध्ये रोजगाराबाबतच्या सर्व समस्या, प्रश्न वाघ यांनी आयोगासमोर मांडल्या. तीनही जिल्ह्यांतील वास्तव भीषण आहे. स्वच्छ पाणी, टॉयलेट, त्यांच्या मुलांना अन्न, त्यांच्या शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या यांना अनुदान देण्याची त्यांची रास्त अशी मागणी आहे. सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.
दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेंतर्गत काम दिले जात आहे असे सांगितले जात आहे; परंतु त्याची माहिती चारा छावण्यांमध्ये दिली जात नाही. ग्रामसेवकांच्या माध्यमातून ती गावागावांत देण्याची गरज आहे. दुष्काळाची भीषणता इतकी आहे की, माणसांनी जगायचे कसे आणि जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न असल्याचे वाघ यांनी सांगितले.