स्वच्छतागृहांमध्येही महिलांना ‘दुजाभाव’

By admin | Published: September 20, 2016 01:22 AM2016-09-20T01:22:12+5:302016-09-20T01:22:12+5:30

अभिनेत्री विद्या बालनच्या माध्यमातून शासनस्तरावर महिलांमध्ये स्वच्छतागृहांबाबत जनजागृतीचा जागर केला जात आहे.

Women 'duality' in cleaner houses | स्वच्छतागृहांमध्येही महिलांना ‘दुजाभाव’

स्वच्छतागृहांमध्येही महिलांना ‘दुजाभाव’

Next

नम्रता फडणीस/प्रज्ञा केळकर-सिंग,

पुणे : ‘राइट टू पी’ ही चळवळ सोशल मीडियावर जोर धरत आहे. अभिनेत्री विद्या बालनच्या माध्यमातून शासनस्तरावर महिलांमध्ये स्वच्छतागृहांबाबत जनजागृतीचा जागर केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या प्रश्नावर प्रशासनाचीच उदासीनता पुणे शहरात दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील तुळशीबाग, मंडई परिसरामधील स्वच्छतागृहांमध्ये महिलांनाच जास्त पैसे आकारून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न चर्चिला जात आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव, स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता अशा गैरसोयींमुळे महिलांना अनेक प्रकारच्या विकारांना सामोरे जावे लागते. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सशुल्क स्वच्छतागृहांमध्ये तर महिलांकडून ५ रुपये शुल्काची आकारणी केली जात आहे. पुरुषांना लघवीसाठी मोफत प्रवेश, केवळ संडासला जाण्यासाठी ५ रुपये; तर महिलांना सरसकटच ५ रुपये मोजावे लागत असल्याचे अजब चित्र पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवून महिलांची राजरोसपणे लूट केली जात आहे.
जादा दर आकारणीमुळे बऱ्याच ठिकाणी महिलांचे कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग अनेकदा अनुभवायला मिळतात. मात्र, त्याची ठोस कारणे दिली जात नसल्याने हा प्रश्न कायम अनुत्तरित राहिला आहे. महानगरपालिकेची स्वच्छतागृहे खासगी ठेकेदाराला चालवायला दिल्यामुळे नागरिकांकडून मनमानीपणे शुल्क आकारणी केली जात आहे.
>महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्त्री आणि पुरुष दोघांकडूनही लघवीसाठी कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. मात्र, शौचास जाण्यासाठी २ किंवा ५ रुपये आकारणी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदारांकडून हा नियम फक्त पुरुषांनाच लागू केला जात आहे.महिलांबाबत हा दुजाभाव का, यासंबंधी ठेकेदाराकडे प्रतिनिधींनी विचारणाही केली. त्यावर, ‘आम्हाला वीजबिल, पाणी, स्वच्छता यासाठी जादा खर्च करावा लागतो. त्यामुळे ५ रुपये आकारले जातात’, अशी उत्तरे मिळाली. मात्र, महिलांची लूट का, याचे उत्तर कोणालाही देता आले नाही.
>दर आकारणी फलक नाही : मध्यवर्ती भागातील परिस्थिती
कोणत्याही स्वच्छतागृहाबाहेर दर आकारणीचे फलक
लावणे बंधनकारक असायला हवे. मात्र, कोठेही असे
फलक आढळून आलेले नाहीत. त्यामुळे अचानक
महिलांकडे ५ रुपये मागितल्यावर त्यांची स्थिती एकदम गोंधळल्यासारखी होते. ‘आधी नाही का सांगायचे’ असे वैतागलेले सूर ऐकायला मिळतात. तुळशीबाग, मंडईसारख्या मध्यवर्ती भागामध्ये महिलांची सातत्याने वर्दळ असते.या परिस्थितीत ही स्वच्छतागृहे त्यांच्यासाठी दिलासा देणारी ठरण्याऐवजी ‘लूट करण्याची जागा’ ठरत आहेत. त्यामुळे, पैसे वाचवण्याच्या नादात अनेकदा महिला स्वच्छतागृहात जात नाहीत. मूत्र रोखून धरल्याने मूत्राशयाचे, पोटाचे, किडनीचे, गर्भाशयाचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. ही परिस्थिती पाहता, मनमानी करणाऱ्या ठेकेदारांवर महानगरपालिकेने कडक कारवाई करावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे.
>हाच अनुभव मंडई परिसरातील दोन स्वच्छतागृहांमध्ये आला. ‘आम्हाला
पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे आम्ही जास्त पैसे घेतो’, असे उत्तर मंडईतील माणसाने दिले. पण, केवळ महिलांकडूनच जास्त पैसे का, याचे उत्तर कोणालाही
देता आले नाही.
एका स्वच्छतागृहातील व्यक्तीने तर मुजोरी करत ‘तुम्हाला कोणाकडे तक्रार करायची तर करा, माझे नाव लिहून घ्या’ असे उत्तर दिले.
‘वाद घालण्यापेक्षा कमी पैसे द्या’,
अशी भूमिकाही एकाने घेतली.
>स्थळ : तुळशीबाग
वेळ : दुपारी ४ वाजता
महिला स्वच्छतागृहात प्रवेश करतानाच कर्मचाऱ्याचे हटकणे.
मॅडम, ५ रुपये द्या
महिला : कसले? सगळीकडे तर २ रुपयेच घेतात.
मुलगा : कोण म्हणाले? या परिसरात सगळीकडे ५ रुपयेच घेतले जातात.
महिला : मग पुरुषांना किती?
मुलगा : त्यांना लघवीला जायचे असेल तर मोफत प्रवेश. केवळ, संडासला जायचे असेल तर ५ रुपये.
महिला : ते तुम्ही कसे ओळखणार?
मुलगा : मॅडम, वाद नको. ५ रुपये द्यावेच लागतील.
महिला : महिलांनीच जास्त पैसे का द्यायचे?
मुलगा : (अरेरावीने) ते आमच्या ठेकेदाराला
विचारा आणि आत्ता पैसे द्या.
>हुज्जत घालूनही नाही फायदा
....हुज्जत घालूनही काही फायदा झाला नाही. पैसे द्यावेच लागले. त्यातून इतर महिलांनीही ‘जाऊ द्या हो, एकदाच तर जायचंय’ असे म्हणत अंग काढून घेतले. पण ‘आपण जादा पैसे का द्यायचे’ याची जाणीव एकाही महिलेला झाली नाही, हे विशेष.

Web Title: Women 'duality' in cleaner houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.