राज्यात लवकरच महिला उद्योग धोरण - सुभाष देसाई
By admin | Published: March 6, 2017 05:32 AM2017-03-06T05:32:47+5:302017-03-06T05:32:47+5:30
सध्या महिला उद्योजकांचेही प्रमाण वाढत आहे.
मुंबई : सध्या महिला उद्योजकांचेही प्रमाण वाढत आहे. महिला उद्योजकांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन लवकरच महिला उद्योग धोरण राबविणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
दादर येथील राजा शिवाजी विद्यालय परिसरातील बी.एन. वैद्य सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘आम्ही उद्योगिनी’ पुरस्कार वितरण समारंभात देसाई बोलत होते. या वेळी खासदार विनय सहस्रबुद्धे, ‘आम्ही उद्योगिनी’ मासिकाच्या संपादिका मीनल मोहाडीकर, तन्वी हर्बलच्या संचालिका मेधा मेहेंदळे, अभिनेता अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, सारस्वत बँकेच्या अनुराधा ठाकूर आदी उपस्थित होते.
महिला उद्योग धोरण तयार करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच, या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांची मदत घेतली जात आहे. यामध्ये उद्योग उभारणीसाठी भांडवल (व्हेंच्युअर कॅपिटल), एमआयडीसीमध्ये महिला उद्योजकांसाठी राखीव भूखंड, कमी व्याजदराने कर्जपुरवठा अशा विविध सूचना शासनाला प्राप्त झाल्या आहेत. या सर्वांचा विचार करून सर्वंकष महिला उद्योग धोरण आकाराला येणार आहे. त्यातून प्रत्येक उद्योगिनीमागे समाज उभा असतो, असे चित्र निर्माण करायचे आहे, असेही देसाई यांनी सांगितले. या वेळी निर्मला अभ्यंकर, भारती वैद्य, विशाखा राव-जठार, सीताबाई मोहिते, शुभांगी चिपळूणकर यांना ‘आम्ही उद्योगिनी’ पुरस्काराने, तर अनुराधा गोरे, नेहा खरे, शर्मिला कलगुटकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी ‘आम्ही उद्योगिनी’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. (प्रतिनिधी)