बाळाचा ताबा मिळविण्यासाठी ‘हिरकणी’ने दिला लढा, दूध पाजण्यास असमर्थ असल्याने पतीने घरातून हाकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 10:50 AM2022-06-07T10:50:14+5:302022-06-07T10:50:34+5:30
सुमारे दीड महिन्याच्या न्यायालयीन लढ्यानंतर बाळाचा ताबा मिळविण्यात मातृत्व यशस्वी ठरले.
पुणे : ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ यातून आईचे बाळाबद्दलचे ममत्व आणि कृतार्थ भाव व्यक्त होतात. आपल्या बाळापासून आईला वेगळं केलं जातं, तेव्हा त्याला मिळवण्यासाठी ती वाघाच्या जबड्यातही हात घालायला मागे-पुढे पाहात नाही.
अशाच एका आईला आपल्या तान्हुल्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली. ती बाळाला दूध पाजण्यास असमर्थ असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिला घरातून हाकलून देत निष्ठुर पतीने १५ दिवसांच्या बाळाला आईपासून दूर केले. सुमारे दीड महिन्याच्या न्यायालयीन लढ्यानंतर बाळाचा ताबा मिळविण्यात मातृत्व यशस्वी ठरले.
सप्टेंबर २०१९ मध्ये राकेश आणि रिना (बदलेली नावे) दोघांचा विवाह झाला. दोघांच्या संसारवेलीवर ३ एप्रिल रोजी गोंडस फूल जन्माला आले. ती आनंदी होती. काही दिवसातच तिला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. ती बाळाला दूध पाजण्यास असमर्थ असल्याचे समजल्यानंतर पतीने तिला १८ एप्रिल रोजी घरातून हाकलून दिले. त्यानंतर तिने छोट्या बाळाचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला.
तिने डॉक्टरांनी दिलेले सर्व सल्ले ऐकले. तरीही तिला घरातून हाकलून देण्यात आले. ज्यामुळे निष्पाप बाळ आईच्या प्रेमाला मुकले. आईवर बाळाचा नैसर्गिक हक्क आहे. ते ६० दिवसांच्या आतील बाळ असल्यामुळे त्याच्या ताब्याची मागणी करण्यात आली.
वडिलांचे वडीलपणही जपण्याचे आदेश
पतीच्या वतीने पत्नीला मानसिक उपचाराची गरज आहे, ती मुलाची काळजी घेण्यास असमर्थ असल्याची बाजू मांडण्यात आली. मात्र, न्यायालयाने मुलाचा ताबा आईकडे देण्याचा आदेश दिला. त्याबरोबरच मुलाची नीट काळजी घेण्याबाबतचे शपथपत्र लिहून घेतले. याबरोबरच वडिलांचेही वडीलपण जपत जरी मुलाचा ताबा आईकडे असला, तरीही वडिलांना बाळाला भेटण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. पिंपरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वानखेडे यांनी हा आदेश दिला आहे.