महिलांना समन्वयातून प्रवेश मिळावा
By admin | Published: February 3, 2016 03:36 AM2016-02-03T03:36:04+5:302016-02-03T03:36:04+5:30
स्त्री-पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे महिलांंना शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश द्यायला हरकत नाही; परंतु हा प्रश्न मतभेदांतून नव्हे, तर समन्वयातून मिटायला हवा
सुधीर लंके, अहमदनगर
स्त्री-पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे महिलांंना शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश द्यायला हरकत नाही; परंतु हा प्रश्न मतभेदांतून नव्हे, तर समन्वयातून मिटायला हवा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळण्यासाठी भूमाता ब्रिगेडने केलेल्या आंदोलनामुळे हा वाद तापला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हजारे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘देवस्थान ट्रस्ट तसेच गावकऱ्यांनी या प्रश्नावर एकत्र येऊन तोडगा काढण्याची गरज आहे. एकत्र बसून हा वाद मिटविता येईल.
देशासमोर त्यांनी या वादाचे प्रदर्शन घडवायला नको. महिला आता सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहेत. स्त्री-पुरुष समता आहे. त्यामुळे सर्वांनी ठरविले तर महिलांना प्रवेश मिळण्यात अडचण काय आहे? परंतु देवस्थानची अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे गावालाही विश्वासात घेऊन बौद्धिक प्रबोधन करूनच हा निर्णय घ्यायला हवा. आपण या विषयावर मध्यस्थी करणार का? असा प्रश्न केला असता, आध्यात्मिक क्षेत्रात माझ्याहूनही अधिकारी दर्जाच्या व्यक्ती आहेत. त्यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार
दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे हजारे म्हणाले.
धर्मदाय आयुक्तांना अंनिसचा सवाल
चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश नाकारण्याच्या कृतीचे आपण समर्थन करीत आहात काय, असा थेट सवालच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धर्मदाय आयुक्तांना निवेदनाद्वारे केला आहे़ त्यामुळे स्त्री प्रवेश बंदीचा वाद आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत़
चौथऱ्यावर सध्या स्त्री व पुरुषांना बंदी आहे, असे विधान खोटे आहे़ देवस्थानला ११ हजार रुपये देणाऱ्या पुरुषाला चौथऱ्यावर प्रवेश दिला जातो़ याचाच अर्थ ही संपूर्ण शोषणव्यवस्था आहे़ यासंदर्भात विश्वस्तांना जाब विचारला का, असा सवाल अंनिसने केला केला आहे़
पतित पावन
संघटनेचा पाठिंबा
शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीला पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष सचिन धोत्रे यांनी पाठिंबा दिला आहे.