महिला तक्रार निवारण समिती

By admin | Published: September 22, 2016 02:19 AM2016-09-22T02:19:41+5:302016-09-22T02:19:41+5:30

गेली तीन वर्षे केवळ कागदावरच असलेली पीएमपीएमएलमधील महिला तक्रार निवारण समिती पुन्हा कार्यरत झाली

Women Grievances Committee | महिला तक्रार निवारण समिती

महिला तक्रार निवारण समिती

Next


पुणे : गेली तीन वर्षे केवळ कागदावरच असलेली पीएमपीएमएलमधील महिला तक्रार निवारण समिती पुन्हा कार्यरत झाली आहे. पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, मागील तीन महिन्यांत समितीने तीन तक्रारींची चौकशी सुरू आहे. त्यातील दोन प्रकरणांमध्ये चौकशीसाठी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, एका कर्मचाऱ्याला चौकशीची नोटीस बजाविण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पीएमपीच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीमधील स्वच्छतागृहात मोबाईलद्वारे छायाचित्रण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने ही समिती कार्यरत करण्यात आली आहे.
राज्यशासनाच्या आदेशानुसार, शासकीय कार्यालयांमध्ये महिलांना होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी पीएमपी प्रशासनाने २0१३ मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात किरकोळ तक्रारी वगळता या समितीकडे फारशा तक्रारी येत नसल्याने ही समिती कागदावरच शिल्लक होती. मात्र, गेल्या वर्षभरात महिलांसंदर्भातील तक्रारी वाढल्या असल्याने तसेच तक्रार करण्यासाठी महिलाही पुढे येत असल्याने काही महिन्यांपूर्वी बीआरटीचा पदभार स्वीकारलेल्या कोल्हे यांनी या समितीची नव्याने नियुक्ती केली आहे. याबाबतचे माहितीफलकही पीएमपी कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेले असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
तक्रारींमध्ये प्रामुख्याने पाठलाग करणे, मानसिक त्रास देणे, कामाच्या ठिकाणी अडवणूक करणे अशा प्रकारच्या तक्रारी असल्याचेही त्या म्हणाल्या.
>तीन वर्षांत सहा तक्रारी
पीएमपीच्या महिला तक्रार निवारण कक्षाकडे गेल्या तीन वर्षांत सुमारे सहा तक्रारी आल्या असून, त्यातील तीन तक्रारी मागील सहा महिन्यांच्या आतील आहेत. याशिवाय काही चालक वाहकांच्या पत्नीही या समितीकडे तक्रार घेऊन येत आहेत.
मात्र, या तक्रारी समितीच्या कक्षेत येत नसल्याने या तक्रारी घेण्यात आलेल्या नसल्या तरी त्यांनी तक्रार कोठे करावी, याबाबत या महिलांना समितीकडून मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याशिवाय गैरसमजातून अथवा किरकोळ स्वरूपात या तक्रारी असल्यास त्या समितीपुढे येण्याआधी दोन्ही पक्षांना तडजोडीची संधी मिळावी यासाठी तडजोड समितीही स्थापन करण्यात आल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Women Grievances Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.