सर्वच पक्षांत महिलांना संधी
By admin | Published: February 5, 2017 11:45 PM2017-02-05T23:45:03+5:302017-02-05T23:45:03+5:30
जिल्ह्यातील ३४ गट व ६४ गण हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना संधी देत महिला सबलीकरणाचा संदेश दिला आहे.
विलास बरी, जळगाव
जिल्ह्यातील ३४ गट व ६४ गण हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना संधी देत महिला सबलीकरणाचा संदेश दिला आहे. भाजपाने सर्वाधिक ११७ महिलांना उमेदवारी दिली आहे. आरक्षणानुसार अमळनेर, भडगाव व जामनेर तालुक्यात महिलाराज राहणार आहे. तर काँग्रेस व भाजपाने काही गट व गणांमध्ये पुरुषांचे आरक्षण असलेल्या जागी महिलांना संधी दिली आहे.
जिल्ह्यातील ६७ जि.प. गटांपैकी ३४ जागांवर महिलांचे आरक्षण आहे. तर १५ तालुक्यांतील १३४ पंचायत समिती गणांपैकी ६४ ठिकाणी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात चारही गटांमध्ये पुरुषांचे आरक्षण असताना भाजपाने या ठिकाणी दोन महिलांना संधी दिली आहे. एरंडोल तालुक्यात दोन गटांत महिलांचे तर एका गटात सर्वसाधारण आरक्षण होते. मात्र या ठिकाणी भाजपाने महिला उमेदवाराला संधी दिली आहे.
राष्ट्रवादीकडून ७४ तर काँग्रेसकडून ३९ महिला
भाजपासोबत राष्ट्रवादी व काँग्रेसने उमेदवारी देताना महिला पदाधिकाऱ्यांचा विचार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील १३० गट व गणांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी ७४ ठिकाणी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. अमळनेर व जळगाव तालुक्यात राष्ट्रवादीने महिलांना सर्वाधिक प्रतिनिधित्व दिले आहे. काँग्रेसने जिल्ह्यात गट व गणांमध्ये ६६ उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी ३९ जागांवर काँग्रेसने महिलांना संधी दिली आहे. जळगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, बोदवड व चाळीसगाव येथे काँग्रेसने सर्वाधिक महिला उमेदवार दिले आहेत.