उद्धव ठाकरे आले अन् गेले, महिला पदाधिकारी संतापल्या; छत्रपती संभाजीनगरात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:46 PM2024-03-20T13:46:34+5:302024-03-20T13:47:08+5:30
उद्धवसाहेब सगळ्यांना भेटतातच, जाताना महिलांनाही भेटले असते मात्र गैरसमज दूर होतील असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर - शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाडा येथे उद्धव ठाकरे आले होते. मात्र त्याठिकाणी महिला आघाडीला न भेटताच निघून गेल्यानं कार्यकर्त्या संतापल्या होत्या. ठाकरे छत्रपती संभाजीनगरात आल्याचे कळताच त्यांना भेटण्यासाठी महिला पोहचल्या होत्या. पण २ तास ताटकळत राहिल्याने महिला संतापल्या. इतक्या वर्षापासून पक्षाचं काम करून भेट दिली नाही अशी नाराजी महिला कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
उद्धव ठाकरे ज्या हॉटेलला थांबले होते. त्याठिकाणी या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या जमल्या होत्या. उद्धव ठाकरे दौऱ्यावर येतात त्याची माहिती दिली जात नाही. उद्धव ठाकरेंनी महिला आघाडीला २ मिनिटे वेळ देऊन विचारपूस करायला हवी. आम्ही त्यांच्यासोबतच आहे. उद्धव ठाकरे आल्यानंतर भेट दिली नसल्याने वाईट वाटते. साहेबांपर्यंत निरोप द्यायला सांगितला. पण साहेब कुणाला भेटणारच नाही असं सांगितले. महिला आघाडी पदाधिकारी आहेत मग आम्ही इतर पक्षाच्या नेत्यांना भेटायचे का? असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला.
तसेच आम्ही महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आहोत. आम्ही लांबून वेळ काढून येतो. पण भेट होत नाही असं त्यांनी म्हटलं. तर महिला आघाडीचा काही गैरसमज झाला असेल तो आम्ही दूर करू. हॉटेलमध्ये महिला आरडा ओरड करू लागल्या म्हणून मी त्यांना शांत बसायला सांगितले असं माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी म्हटलं.
दरम्यान, महिला पदाधिकारी नाराज होऊन गेल्या असतील तर त्यांना आम्ही समजावू. उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करतायेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हीसुद्धा शिवसैनिकांची जबाबदारी आहे. उद्धवसाहेब सगळ्यांना भेटतातच, जाताना महिलांनाही भेटले असते मात्र गैरसमज दूर होतील. उद्धव ठाकरेंच्या भेटण्याच्या वेळा असतात. कधीही कोणत्याही वेळी भेटत नाही. आपणही नियम, शिस्त पाळली पाहिजे असा खोचक सल्ला अंबादास दानवेंनी महिला पदाधिकाऱ्यांना दिला.