महिला प्रवाशांचा ‘एल्गार’
By admin | Published: July 21, 2016 02:35 AM2016-07-21T02:35:51+5:302016-07-21T02:35:51+5:30
मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात विनयभंग, अश्लिल हावभाव, छेडछाडीला सामोरे जावे लागते.
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात विनयभंग, अश्लिल हावभाव, छेडछाडीला सामोरे जावे लागते. त्याविरोधात काही मोजक्याच महिला प्रवाशांकडून रेल्वे पोलिसांत (जीआरपी) तक्रार करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. मात्र गेल्या काही वर्षात महिला संदर्भातील गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर आले आहे. यात महिला प्रवासीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घेत असून रेल्वे पोलिसांत दाखल झालेल्या नोंदीनुसार त्यांनी ‘एल्गार’च पुकारला आहे.
२0११ सालापासून विनयभंग, अश्लिल हावभाव यासंदर्भातील गुन्ह्यांची नोंद रेल्वे पोलिसांत वाढत आहे. त्याविरोधात रेल्वे पोलिसांकडून कारवाई जरी केली जात असली तरी महिला प्रवाशांनी पुढाकार घेतल्याने कारवाई करण्यास शक्य होत असल्याचे रेल्वे पोलिस सांगतात. २0११ साली विनयभंगाच्या ८ केसेस दाखल झाल्या होत्या. २0१५ साली ८९ केसेसची नोंद झाली. तर २0१६ च्या जून महिन्यापर्यंत ३८ केसेस दाखल झाल्याचे सांगण्यात आले. पुरुषांकडून महिला डब्यासमोर उभे राहून अश्लिल हावभाव केले जातात. त्याविरोधातही केसेसची नोंद होते. २0११ साली तीन केसेस दाखल झाल्या असतानाच २0१५ साली ९ तर यंदाच्या वर्षात पाच केसेस दाखल झाल्या आहेत. विनयभंग, अश्लिल हावभाव, छेडछाड याविरोधात तक्रार करण्यासाठी महिला पुढाकार घेत नव्हत्या. मात्र त्यासंदर्भात होत असलेली जनजागृती पाहता महिला प्रवाशांकडून आता पुढाकार घेण्यात येत आहे.
>खून, खूनाचा प्रयत्न, बलात्काराच्याही घटना
मुंबई उपनगरीय रेल्वे आणि हद्दीत महिला संदर्भाती खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, पळवून नेण्याच्या घटनांचीही नोंद होत आहे. त्या गुन्ह्यांचा रेल्वे पोलिसांकडून छडा लावण्यात येत आहे. २0११ ते २0१४ पर्यंत खूनाच्या १३ घटना घडल्या होत्या. यात १२ गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
त्याचप्रमाणे खूनाच्या प्रयत्नांच्याही चार गुन्ह्यांची नोंद असून त्या सर्व गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आल्याचे सांगण्यात आले. २0११ पासून रेल्वे हद्दीत १९ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली असून या गुन्ह्यांचाही रेल्वे पोलिसांकडून यशस्वीरित्या तपास करण्यात आला आहे. १८ गुन्ह्यांची उकल रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत केली आहे. पळवून नेण्याच्या घटनाही घडल्या असून आतापर्यंत ४८ गुन्ह्यांची नोंद आहे आणि त्याचीही उकल केली आहे.
>रेल्वे (लोहमार्ग) पोलिसांकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना
प्रत्येक पोलिस ठाण्यात एक महिला समिती स्थापन. या समितीमध्ये महिला, समाजसेविका, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेतील महिला सभासद, महिला पोलीस कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच समितीच्या बैठका घेवून महिला विषयी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये या सभासदांची मदत घेतली जाते.
लोकल गाड्यांमधील महिलांच्या संरक्षणासाठी रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत लोकलमधील महिला डब्यात शस्त्रधारी पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी स्थानकांवर सीसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लोकलमध्ये महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्याचे नियोजन केले जात आहे.
जीआरपी निर्भया व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांक ९८३३३१२२२२ किंवा २३७५९२८३ या नियंत्रण कक्षावर संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.