नेवाळी आंदोलनात महिला पोलिसांचा विनयभंग

By admin | Published: June 24, 2017 11:16 AM2017-06-24T11:16:47+5:302017-06-24T11:16:47+5:30

ग्रामस्थांनी जाळपोळ, दगडफेकीबरोबरच महिला पोलिसांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे

Women police molestation in Navy agitation | नेवाळी आंदोलनात महिला पोलिसांचा विनयभंग

नेवाळी आंदोलनात महिला पोलिसांचा विनयभंग

Next

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 24- विमानतळाच्या जागेतील शेतजमिनी परत मिळाव्या यासाठी नेवाळी, भाल परिसरात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं. गुरुवारी हिंसक आंदोलन करणाऱ्या नेवाळी येथील ग्रामस्थांनी जाळपोळ, दगडफेकीबरोबरच महिला पोलिसांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  डीएनए या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. आंदोलनकर्त्यांनी महिला पोलीसाचा गणवेश फाडल्याचं हीललाइन पोलीस स्टेशनमध्ये दाखळ झालेल्या एफआयआरमध्ये म्हंटलं आहे. 
 
आपल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही हल्ला केला. या हल्ल्यात 12 पोलीस जखमी झाले होते. यामध्ये चार महिलांचाही समावेश होता. खरंतर आंदोलनात महिला आंदोलकांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर असल्याने पोलिसांच्या तुकडीत महिला पोलीसही मोठय़ा संख्येने होते. विनयभंगाच्या गुन्ह्य़ासह साहाय्यक पोलीस आयुक्तांसह १२ पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
 
ठाणे पोलीस विभागाने कल्याणमधील नेवाळी, खोनी आणि भाल या गावातील 700 जणांच्या विरोधात चार एफआयआर दाखल केले आहेत. खून करणं, दंगल घडविणं तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी झालेल्या घटनांचे स्वरूप पाहता तेथील हिंसाचार पूर्वनियोजित होता, असं हिललाइन पोलीस स्टेशन आणि मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उपचारासाठी ज्या आंदोलनकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे त्यांना तेथूनच अटक होऊ शकते, अशी माहिती ठाणे पोलिसांनी डीएनएला दिली आहे. 
 
नेवाळीतील हिंसाचार पूर्वनियोजित?
विमानतळाच्या जागेतील शेतजमिनी परत मिळाव्या यासाठी नेवाळी, भाल परिसरात शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी झालेल्या घटनांचे स्वरूप पाहता तेथील हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा आरोप पोलीस आणि संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी केला. छायाचित्रे काढून देण्यास केलेला विरोध, वाहने जाळणे, वाहतूक रोखून धरणे हे नियोजनबद्धरित्या सुरू होते, असा त्यांचा दावा आहे. या भागातील विकास प्रकल्पांमुळे जमिनींना आलेल्या भावामुळे शेतकऱ्यांना पुढे करून काही राजकीय नेत्यांनी या आंदोलनावर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांना लाकडी दांडके, लोखंडी रॉडने झालेली मारहाण पाहता आंदोलक पुरेशा तयारीनिशी आल्याचाही त्यांचा दावा आहे. आंदोलकांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने लाठीमार केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा प्रत्यारोप केला आहे.
नेवाळीच्या जागेचा सातबारा संरक्षण खात्याच्या नावावर असल्याचा त्यांच्या जनसंपर्क विभागाचा दावा आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना, याबाबत वेगवेगळ््या विभागांना निवेदने दिली असताना आंदोलन केले जाते. ते शांततेत पार पडेल, असे सांगितले जात असताना जाळपोळ सुरू होते. पोलिसांना लक्ष्य करून मारले जाते. दगडफेक होते. वाहने जाळली जातात. त्या आंदोलकांची छायाचित्रे काढू दिली जात नाहीत, हे नियोजनबद्ध असल्याचे दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विमानतळाच्या जागेवरील संरक्षण खात्याचा अधिकार केंद्र सरकार, राज्य सरकारने मान्य केला आहे. त्या जागेची भरपाईही देण्यात आली आहे. त्यानंतरही तेथे शेती केली जात असली, आता भिंत बांधल्यामुळे तेथे प्रवेश करता येणार नाही. त्यातून वहिवाट बंद होईल आणि लाखमोलाच्या जमिनीवर दावा सांगता येणार नाही, यामुळेच हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आंदोलकांच्या नेत्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. पोलिसांनी महिलांवर लाठीहल्ला केल्याने त्यांच्यावर दगडफेक झाली; हा आयत्यावेळचा उद्रेक होता, असा दावा त्यांनी केला. मात्र गाड्या जाळणे, टायर जाळणे, पोलिसांना दंडुक्याने मारणे याबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही.
 
 
 

Web Title: Women police molestation in Navy agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.