महिला पोलीसही होणार ‘इन्चार्ज’

By admin | Published: May 24, 2017 02:59 AM2017-05-24T02:59:31+5:302017-05-24T02:59:31+5:30

खाकी वर्दीचे कर्तव्य जपण्यासाठी पुरुषांप्रमाणेच वेळेची पर्वा न करता मिळेल ती जबाबदारी आणि ड्युटी बजावत असून

Women police will also be in charge of 'Incharge' | महिला पोलीसही होणार ‘इन्चार्ज’

महिला पोलीसही होणार ‘इन्चार्ज’

Next

जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खाकी वर्दीचे कर्तव्य जपण्यासाठी पुरुषांप्रमाणेच वेळेची पर्वा न करता मिळेल ती जबाबदारी आणि ड्युटी बजावत असूनही केवळ स्त्री असल्याने सापत्नपणाची वर्तणूक मिळणाऱ्या राज्य पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, अंमलदारांसाठी एक खूशखबर आहे. महिला पोलिसांना त्यांची ज्येष्ठता व कार्यक्षमतेनुसार आता पोलीस ठाणे व विविध शाखा, विभागातील प्रभारी, महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी त्याबाबत सर्व पोलीस घटकप्रमुुखांना सूचना केल्या आहेत.
सर्व आयुक्त व अधीक्षकांनी आपापल्या कार्यकक्षेतील कार्यक्षम महिला अधिकारी, अंमलदारांना पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी (इन्चार्ज)सह महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करावी, त्याबाबतचा कार्यअहवाल पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
राज्य पोलीस दलात दोन लाख दहा हजारांवर मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यात महिलांचे प्रमाण साडेसात टक्के म्हणजे २६ हजार इतके आहे. अन्य विविध कार्यक्षेत्रे व विभागाप्रमाणेच पोलीस दलातील या महिला अधिकारी, अंमलदार पुरुषांच्या बरोबरीने कर्तव्य बजावत आहेत. मात्र काही अपवाद वगळता बहुतेक महिला पोलिसांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यम दर्जाचे काम दिले जाते. त्यात वायरलेस, आरोपी पार्टी,बंदोबस्त अशा ड्युट्या दिल्या जातात. त्याबाबत महिला पोलिसांकडून अप्रत्यक्ष व्यक्त होत असललेली नाराजी लक्षात घेऊन महासंचालक माथूर यांनी सर्व पोलीस घटकप्रमुखांना सूचना केल्या आहेत. ज्या महिला अधिकारी, अंमलदार महत्त्वाच्या ठिकाणी, कार्यकारी पदावर (एक्झिक्युटिव्ह) पदावर काम करण्यास इच्छुक आहेत आणि त्या सक्षम असल्यास त्यांची तेथे नियुक्ती करावी, त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याचे प्रभारीपद, महिला व बालकाच्या संबंधी गुन्ह्यांच्या तपासकामांमध्ये त्यांच्याकडे प्रमुख जबाबदारी देण्याबाबत प्रामुख्याने विचार करावा, या वर्षाच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध महिला पोलिसांचा आढावा घेऊन त्यानुसार त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याबाबत निर्णय घेण्यात यावा.
त्याबाबतचा कार्यअहवाल मुख्यालयात पाठवावा, असे आदेश दिले आहेत. यासंबंधी १४ जूनला होणाऱ्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.


भ्रष्टाचाराला आळा बसण्याची अपेक्षा
भ्रष्टाचारात पोलीस विभागाचा क्रमांक अव्वल आहे. त्यामुळे पुरुष अधिकारी, अंमलदारांच्या तुलनेत महिलांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवल्यास त्यांच्याकडून होणारा गैरव्यवहार, भ्रष्टाचारालाही काही प्रमाणात लगाम बसू शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.


अन्य शासकीय विभागाप्रमाणेच पोलीस दलातील महिला अधिकारी, अंमलदार आपले कर्तव्य सक्षमपणे बजावत आहेत. त्यामुळे केवळ महिला असल्याने त्यांना पोलीस ठाण्याचे प्रभारी पद व अन्य महत्त्वाच्या जबाबदारीपासून वंचित ठेवणे अयोग्य आहे. त्यामुळे सक्षम असणाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याबाबत सर्व घटकप्रमुखांना सूचना केल्या आहेत.
- सतीश माथूर, पोलीस महासंचालक

Web Title: Women police will also be in charge of 'Incharge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.