एसटी महामंडळाच्या मेगा भरतीकडे महिलांची पाठ; नियम केले शिथिल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:58 PM2019-02-08T18:58:53+5:302019-02-08T18:59:46+5:30
भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.
मुंबई : बेरोजगारी वाढल्याच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाने दिलासा दिला असून तब्बल ८,०२२ चालक, वाहक पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे.
भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. याबरोबरच महिला उमेदवारांना शारीरीक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली असून ही अट किमान १६० सेंमीवरुन किमान १५३ सेंमी करण्यात आली आहे. तसेच पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट शिथील करण्यात आली असून ३ वर्षाऐवजी १ वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवारही अर्ज करु शकणार आहेत.
महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यानुसार २४०६ महिलांची भरती केली जाणार आहे. दुष्काळग्रस्त भागासाठी अर्ज करण्याच्या तारखेस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी रोजी होणार लेखी परिक्षा होणार असून आजअखेर २८९ महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. या पदासाठी महिला उमेदवारांनाही अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक होते. ही अट रद्द करण्यात आली आहे. परिक्षेअंती ज्या महिलांची निवड होईल त्यांना महामंडळामार्फत १ वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना महामंडळामार्फत विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रितसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकतील, असे ते म्हणाले.