महिलांनी अवघडलेल्या अवस्थेत प्रवास टाळावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 02:10 AM2019-05-05T02:10:37+5:302019-05-05T02:11:24+5:30
चक्क केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी टिष्ट्वट करून ठाणेकर नेहमीच देशाच्या सेवेसाठी तत्पर असतात, असा अभिप्राय दिल्याने त्याची देशभर चर्चा झाली. त्याबद्दल या क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांच्याशी साधलेला संवाद...
- पंकज रोडेकर
कणकवलीतून कोकणकन्या एक्स्प्रेसने येताना ठाणे रेल्वेस्थानकातील वन रूपी क्लिनिकमध्ये (प्रथमोपचार केंद्र) एका २१ वर्षीय महिलेची सुखरूप प्रसूती झाली. या प्रसूतीची दखल घेऊन चक्क केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी टिष्ट्वट करून ठाणेकर नेहमीच देशाच्या सेवेसाठी तत्पर असतात, असा अभिप्राय दिल्याने त्याची देशभर चर्चा झाली. त्याबद्दल या क्लिनिकचे संचालक
डॉ. राहुल घुले यांच्याशी साधलेला संवाद...
आपण करत असलेल्या कामाची देशपातळीवर चर्चा होते, याविषयी कसे वाटते?
नक्कीच ती चांगली गोष्टी आहे. तसेच ती अभिमानास्पदही आहे. त्यातून पुढील वाटचाल करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेसह प्रेरणा मिळते. अजून चांगल्या प्रकारे सेवा कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जाईल.
आतापर्यंत प्रसूतीदरम्यान काही अडथळे आले का? तसेच ते
कसे पार केले?
ठाणे रेल्वेस्थानकात आतापर्यंत केलेल्या चारही प्रसूती सुदैवाने नॉर्मल झाल्या आहेत. त्या करताना त्यावेळी उत्तम डॉक्टर, साधने, औषधांसह निर्णय योग्य पद्धतीनेच घेतल्याने धोका किंवा कोणतीही इजा झालेली नाही. रेल्वेतील अपघातग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार करत असल्याने या प्रसूती करतानाही यश आले आहे.
क्लिनिक सुरू करण्यामागचा उद्देश काय? आतापर्यंत किती रेल्वेस्थानकांवर तीसुरू झाली आहेत?
आईवडिलांच्या झालेल्या अपघातातून ओढवलेल्या परिस्थितीतून क्लिनिकची संकल्पना पुढे आली. सद्य:स्थितीत, वैद्यकीयसेवा लोकांच्या खिशाबाहेर जात आहे. त्यातून ही सेवा नागरिकांच्या बजेटमध्ये यावी, या दृष्टिकोनातून खारीचा वाटा म्हणून ‘मॅजिक दिल’ या संस्थेच्या माध्यमातून वन रूपी क्लिनिक सुरू झाले आहे. मुंबई विभागातील मध्य रेल्वेवरील गर्दीच्या ११ स्थानकांवर ते सुरू आहे, तर येत्या ७ मे रोजी पश्चिम रेल्वेवरील एका स्थानकावर ते सुरू होत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे?
रेल्वे प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्थींनुसार क्लिनिक सुरू आहेत. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जसे सहकार्य मिळत आहे, तसेच सहकार्य यापुढेही मिळावे. त्यातून जास्तीतजास्त हातभार लावाला. ही सेवा आणखी चांगल्या प्रकारे देण्यासाठी मागे पडणार नाही.
गरोदर महिलांना काय सांगाल?
दिलेल्या तारखेलाच प्रसूती होईल, हे सांगता येण्यासारखे नाही. ती तारीख कधी मागे किंवा पुढेही होऊ शकते.
त्यामुळे या दिवसांत लांबचा प्रवास करणे शक्यतो टाळावे, तसेच जवळ असणाऱ्या रुग्णालयाचीच निवड करण्यास प्राधान्य द्यावे.
अन्यथा, संबंधित महिलेसह त्या नवजात बाळाच्या जीवावर एखाद्या वेळी बेतण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अशा अवघडलेल्या अवस्थेत शक्यतो प्रवास टाळावा.