महिलांना योग्य सन्मान मिळावा; दृष्टिकोन बदलण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 07:01 AM2024-09-04T07:01:24+5:302024-09-04T07:01:56+5:30
Draupadi Murmu: देशातील आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महिलांना योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बोलून दाखविली.
मुंबई - देशातील आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महिलांना योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, अशी भावना बोलून दाखविली. महिलांकडे बघण्याची दृष्टी काही ठिकाणी संकुचित दिसते. ती बदलण्याची, सुधारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आज महिला जे काही सोसत आहेत, ते त्यांना पुढे जाऊन भोगावे लागू नये, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
महाराष्ट्रविधान परिषदेचा शतकमहोत्सव सोहळा मंगळवारी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. यावेळी उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट वक्ते यांचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.
माझ्या मनालाही वेदना
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तेव्हा करोडो भारतीयांप्रमाणे माझ्या मनालाही वेदना झाल्या, परंतु जो पडला तो केवळ पुतळा होता. प्रत्येकाच्या हृदयात शिवाजी महाराजांचे स्थान अढळ असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली.
‘गर्जा महाराष्ट्र माझा’
संविधानाच्या हस्तलिखिताच्या १५ व्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र सुशोभित आहे. म्हणून संविधान व्यवस्थेशी निगडीत या कार्यक्रमात आम्ही शिवाजी महाराजांना विशेष नमन करतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या ‘बहुत असो संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या ओळींचा उल्लेख करत कवी राजा बढे यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताच्या ओळीही त्यांनी म्हटल्या.
‘विधान परिषद लोकशाहीचा आधारस्तंभ’
विधान परिषद सभागृहाला एक परंपरा लाभली असून, लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक संस्थांपैकी राज्य विधान परिषद आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गोपाळकृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, वि. स. पागे यांसारख्यांनी राज्याला, देशाला दिशा देण्याचे काम केले, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. राज्यातील विधिमंडळ हे देशातील सर्वात महत्त्वपूर्ण सभागृह म्हणून ओळखले जाते. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक सदस्य अत्यंत मेहनतीने काम करत असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.