Andheri East By Election: 'महिलेवर अन्याय होऊ नये'; मुरजी पटेल यांनी केले अंधेरीत मतदान, पण कोणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 08:37 AM2022-11-03T08:37:25+5:302022-11-03T08:38:23+5:30
Andheri East By Election Update: अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपा-शिंदे गटाने माघार घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासाठी ही लढाई सोपी झाली आहे. भाजपाच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली असली तरी ही निवडणूक बिनविरोध करता आलेली नाही. असे असताना शिंदे गट, भाजपा आणि त्यांचे माघार घेतलेले उमेदवार मुरजी पटेल कोणाला मतदान करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.
अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे, नीना खेडेकर, फरहाना सय्यद, राजेश त्रिपाठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय बाला नाडर यांनी आपकी अपनी पार्टी पीपल्स या पक्षाकडून अर्ज भरला आहे. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. मतदान करता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे.
मुरजी पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका महिलेवर अन्याय होऊ नये, असे माझे मत आहे. पुढे जाऊन ऋतुजा लटकेंची तृप्ती सावंत करू नये. मी आता मतदान करत आहे. अंधेरीतील नागरिकांनी देखील मतदान करण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन पटेल यांनी केले.
भाजपा आणि शिंदे गटाकडून नोटाला मतदान करण्याचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप लटकेंनी केला होता. यावर आम्ही नोटाला मतदान करण्याचा प्रचार केला नाही. कोणाला मत द्यायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असे पटेल म्हणाले.