महिलांनी अत्याचाराचा प्रतिकार करावा
By Admin | Published: August 3, 2016 12:51 AM2016-08-03T00:51:54+5:302016-08-03T00:51:54+5:30
प्रत्येक घरातील महिलेने ठरविले, तर कोणत्याही घरात भ्रष्ट पैसा येणार नाही.
पुणे : प्रत्येक घरातील महिलेने ठरविले, तर कोणत्याही घरात भ्रष्ट पैसा येणार नाही. आपल्या हिमतीवर महिलांनी आपले कर्तृत्व गाजवावे. अत्याचारांविरोधात महिलांनी स्वत:च प्रतिकार केला पाहिजे. महिला बदलल्या तर देशदेखील खऱ्या अर्थाने बदलू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ प्रा. डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत भरत नाट्य मंदिर येथे भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. मधुबाला चोरडिया, उद्योजक गणेश भिंताडे, नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे, अनिल दिवाणजी, डॉ. सतीश देसाई, कलाकार विकास पाटील, सायली देवधर, राहुल सूर्यवंशी, भोला वांजळे, गोविंद वांजळे, प्रियेश सरोदे, दिनेश पिसाळ, तुषार रायकर, सुधीर साकोरे, योगेश निकम आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ संगीतकार पं. हदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, रांका ज्वेलर्स कर्वे रोडचे संचालक ओमप्रकाश रांका, प्रवीण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया, खारवडे म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मधुरा भेलके-मारणे आणि सुनील जगताप यांना भूषण पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी, मंडईमध्ये ज्या भागात आमचे वडील पं. दीनानाथ मंगेशकर व कुटुंबीय राहत होतो आणि ज्या ठिकाणी वडिलांनी अखेरचा श्वास घेतला, त्या भागातील संस्थेकडून पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत हृद्य गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा नव्हे, तर माझ्या वडिलांचा आणि माझ्या मंगेशकर कुटुंबीयांचा आहे, असे सांगितले.
मधुरा भेलके मारणे म्हणाल्या, ‘‘धार्मिक संस्थांना धार्मिकतेकडून विधायकतेकडे नेण्याच्या दृष्टीने खारवडे म्हसोबा देवस्थानचे कार्य सुरू आहे. लोकांच्या भावना न दुखावता त्यांच्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम आम्ही केले. देवस्थानला मिळणाऱ्या देणग्या पुन्हा समाजाकडे वळवून समाजहिताचे कार्य आम्ही करीत आहोत.’’
हर्षदा खानविलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अभिनेत्री अश्विनी जोग यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)