जिजाऊंच्या राज्यात महिला असुरक्षित
By admin | Published: October 6, 2014 04:36 AM2014-10-06T04:36:11+5:302014-10-06T04:36:11+5:30
आई जिजाऊंच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. त्यांचा सन्मान होत नाही. अत्याचारी लोकांना वाचविण्याचे काम राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार करीत आहे
जळगाव : आई जिजाऊंच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. त्यांचा सन्मान होत नाही. अत्याचारी लोकांना वाचविण्याचे काम राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार करीत आहे, असा आरोप केंद्रीय मानवसंसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी प्रचारसभेत केला.
इराणी म्हणाल्या, राज्यात कुणी नागरिकांच्या समस्या ऐकायला तयार नाही. महागाईचा फटका बसत आहे. केंद्रात बदल झाला आता राज्यातही बदल होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी अहंकारी आहे. अजित पवारांकडे पाणी मागितले होते. त्यांनी धरणे भरण्याबाबत खालच्या पातळीचे विधान केले. मावळमध्ये शेतकऱ्यांवर सिंचनासाठी पाणी मागितले तर गोळीबार झाला. शेतकरी कर्जात बुडत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना न वटणारे धनादेश देऊन त्यांची थट्टा काँग्रेसने केली आहे. पण ही निवडणूक भाजपा किंवा भाजपाच्या उमेदवारांची नाही ती शेतकऱ्यांची आहे. अनेक युवक बेरोजगार आहेत. आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नाईलाजाने त्यांना रिक्षा चालवावी लागते. आम्ही देशाचा विकास करण्यास कटीबद्ध आहोत. बदल आम्ही घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)