राज्यातील ‘त्या’ महिलांना रेशनिंगवर मोफत नॅपकिन, मेपासून लागू करण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:20 AM2018-02-16T02:20:22+5:302018-02-16T02:22:12+5:30
राज्यातील कर्करोगग्रस्त, अपंग आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना रेशनिंगवर मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची योजना १ मेपासून लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे.
मुंबई : राज्यातील कर्करोगग्रस्त, अपंग आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना रेशनिंगवर मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची योजना १ मेपासून लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे. त्यानंतर आझाद मैदानात सुरू असलेले उपोषण विचारधार ग्रामीण विकास संस्थेच्या सरचिटणीस छाया काकडे यांनी गुरुवारी मागे घेतले.
महिलांना रेशनिंगवर मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळावे, म्हणून गेल्या आठवड्याभरापासून काकडे आझाद मैदानात उपोषण करत आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सदर आश्वासन दिल्याची माहिती काकडे यांनी ‘लोकमत’ला दिली. यासंदर्भातील अहवाल मंगळवारपर्यंत शासनाकडे सादर करणार असल्याचेही काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आठवडाभर उपोषण केल्यानंतर काकडे यांची तब्बेत बुधवारी खालावली होती. त्यांना गोकुळदास तेजपाल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, उपचार घेण्यास किंवा रुग्णालयात दाखल करून घेण्यास काकडे यांनी नकार दिला. तसेच आझाद मैदानातील उपोषण सुरूच ठेवले. अखेर आझाद मैदान पोलिसांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री आणि महिला व बालविकासमंत्री यांची संयुक्त भेट घडवल्याचे काकडे यांनी सांगितले.