दारूबंदीसाठी महिलांनी घेतली काठी
By admin | Published: June 11, 2017 02:14 AM2017-06-11T02:14:45+5:302017-06-11T02:14:45+5:30
दारूमुळे उद्ध्वस्त झालेले संसार, गावात वाढते तंटे, व्यसनाधीन होत चाललेली तरुणाई आदी कारणांमुळे गावाची अधोगती होत असताना प्रशासनावर अवलंबून
- राजेश भिसे । लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दारूमुळे उद्ध्वस्त झालेले संसार, गावात वाढते तंटे, व्यसनाधीन होत चाललेली तरुणाई आदी कारणांमुळे गावाची अधोगती होत असताना प्रशासनावर अवलंबून का राहायचे? हाच विचार करून जाफराबाद तालुक्यातील सातेफळ या गावातील महिलांनीच पुढाकार घेत बाटली आडवी केली. या महिलांनी गावात २४ तास गस्त सुरु केली असून, तळीरामांना लाठी ‘प्रसाद’ दिला जात आहे. तरुणांसह वृद्धांनीही या महिलांची धास्ती घेतली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी सर्रास दारूविक्री होत आहे. जवळपास २ हजार लोकसंख्या असलेल्या सातेफळ गावात अवैध दारूविक्री सुरू आहे. तेथे अनेक वेळा दारूबंदीसाठी उपोषण, आंदोलने झाली, प्रशासनाला निवेदने देण्यात आली; मात्र, दारूविक्री बंद होऊ शकली नाही. परिणामी १२-१३ वर्षांची मुलेही व्यसनाधीन
होऊ लागली. गावात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे सर्व ध्यानी घेऊन महिलांनीच पुढाकार घेत
५० महिलांचे वेगवेगळे पथक
स्थापन केले.
एक महिन्यापासून या गावात महिलांची गस्त सुरू आहे. गावातील वृद्ध महिलांनीही यात मुख्य भूमिका निभावली आहे. याचा चांगला परिणाम दिसून येत असून, तरुणाई या महिलांच्या धास्तीने दारूपासून दूर राहत असल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा सविता राधाकिसन माळी,
ममताबाई काळे, सुमन हरणे, शोभा घाडगे, सुमन निकाळजे, शांता
खंदारे, मंदा बनकर, राधा ससाने, पद्ममा तांबे, मीरा माळी, फुलबाई खंदारे, कौसाबाई जटाळे, नंदा फुलमाळी, पुष्पा मुळे, गयाबाई साळुंखे या महिलांनी पुढाकार घेतला आहे.
दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. युवक आणि तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली. म्हणूनच याविरोधात आवाज उठविण्याचा आम्ही निर्धार केला. गावातील महिलांना एकत्र आणून लढा उभारला. याला यश येत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
- सविता राधाकिसन माळी, अध्यक्षा, तंटामुक्त समिती, सातेफळ