महिला तहसीलदार अपहरण नाट्य
By admin | Published: February 9, 2015 08:05 AM2015-02-09T08:05:25+5:302015-02-09T08:05:25+5:30
एकतर्फी प्रेमातून तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार कल्पना गोडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करीत त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी प्रफुल्ल युवराज वीर (२७) याला पोलिसांनी रविवारी अटक केली.
दापोली : एकतर्फी प्रेमातून तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार कल्पना गोडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करीत त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी प्रफुल्ल युवराज वीर (२७) याला पोलिसांनी रविवारी अटक केली. शनिवारी घडलेल्या या प्रकरणाबाबत तहसीलदार गोडे यांनीच फिर्याद दिली आहे.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात प्रफुल्ल युवराज वीर (मुळचा पुण्याचा) हा तहसील कार्यालयात आला आणि त्याने थेट तहसीलदार गोडे यांचे दालन गाठले. त्या ठिकाणी गोडे व प्रफुल्ल यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आक्रमक होऊन प्रफुल्लने गोडे यांच्या टेबलावरील साहित्याची फेकाफेक करीत त्यांना शिवीगाळ व मारहाणही केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवून तो घेऊन गेला.
तहसील कार्यालयातील कर्मचार्यांनी तत्काळ ही घटना पोलिसांना कळविली. महिला तहसीलदाराचे अपहरण झाल्याचे समजताच नाकाबंदी करण्यात आली. ही गाडी पोलिसांनी वाटेतच अडविली. मात्र, त्यावेळी गोडे यांनीच आपला हा खासगी प्रश्न असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी न करता गाडी सोडून दिली.
नंतर गोडे यांनी रविवारी कोथरूड (जि. पुणे) पोलीस ठाण्यात या घटनेबाबत फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा दापोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
प्रफुल्ल याच्याशी आपली ओळख होती. तो आपल्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तो आपल्याला जातीवरून कायम हिणवत असे. आपण त्याच्याशी विवाह करीत नसल्याने त्याने शनिवारी कार्यालयात घुसून हा प्रकार केल्याचे गोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अपहरण करणार्या पुण्यातील तरूणा विरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३६३, ३२३, ५0६, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९चे कलम ३(१) (११) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) तहसीलदारांच्या केबीनमधून मोठय़ाने आवाज आला म्हणून आम्ही आत गेलो, त्यावेळी तहसीलदार कल्पना गोडे यांनी आपला हा खासगी प्रश्न असल्याचे सांगितल्याने आपण माघारी परतलो. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
- जयराज देशमुख, नायब तहसीलदार दापोली