महिला सर्वच क्षेत्रात अव्वल - नीता अंबानी
By Admin | Published: July 24, 2016 05:00 AM2016-07-24T05:00:58+5:302016-07-24T05:00:58+5:30
एका अहवालानुसार केवळ २५ टक्के महिलाच नोकरी करतात, असे निदर्शनास आले. मात्र माझ्या मते देशातील सर्वच महिला विविध क्षेत्रात काम करत असून त्या सर्वच क्षेत्रात अव्वल आहेत
- ‘शी वॉक, शी लीड्स’ पुस्तकाचे प्रकाशन
एका अहवालानुसार केवळ २५ टक्के महिलाच नोकरी करतात, असे निदर्शनास आले. मात्र माझ्या मते देशातील सर्वच महिला विविध क्षेत्रात काम करत असून त्या सर्वच क्षेत्रात अव्वल आहेत, असे प्रतिपादन नीता अंबानी यांनी ‘शी वॉक, शी लीडस्’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी केले. उद्योजक आणि लेखिका गुंजन जैन यांच्या ‘शी वॉक, शी लीडस’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी ताजमहाल पॅलेस येथे पार पडला.
या सोहळ्यात नीता अंबानी यांनी आपले हे मत व्यक्त केले. पुस्तकाविषयी त्या म्हणाल्या की, देशात विविध क्षेत्रात महिला स्थान टिकवून आहेत. हे पुस्तक त्याचीच साक्ष आहे. महिला आणि पुरुष असा भेद करणाऱ्यांसाठी ती एक चपराक आहे. येत्या काही वर्षांमध्ये महिला अधिक सक्षम होतील, यात काही शंकाच नाही. या सोहळ्यात सिनेसृष्टीसह उद्योग जगतातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी त्याला पाठिंबा देणाऱ्या अनेक महिलांचे शाहरुखने यावेळी आभार मानले. पुस्तकाविषयी बोलताना उद्योजक अजय पिरामल यांनी सिंधुताई सपकाळ यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यातील चढउतार पाहिला की, महिला किती सक्षम असू शकते याचा अंदाज येतो. एकदा तरी सगळ्यांनीच सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी वाचावे. त्याचा फायदा महिला आणि पुरुष दोघांनाही होईल.
लेखिका गुंजन जैन यांनी पुस्तकाच्या घडणीमागचे अनुभव कथन केले. या पुस्तकात विविध क्षेत्रातील २४ महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने राजश्री बिर्ला, नीता अंबानी, सुधा मूर्ती, चंदा कोचर, प्रियंका चोप्रा, करिना कपूर, अमानिका खन्ना, ज्योत्स्ना दर्डा, मेरी कोेम, सानिया मिर्झा या दिग्गज महिलांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. याप्रसंगी मुकेश अंबानी, आदी गोदरेज, सुहेल सेठ, दीपक पारेख, अनंत अंबानी, ‘लोकमत’ समूहाचे विजय दर्डा, देवेंद्र्र दर्डा, ऋषी दर्डा, करण दर्डा, शायना एनसी, सीमी गरेवाल, सुझान रोशन, स्वाती पिरामल यांची विशेष उपस्थिती होती.