महिलांना हवे शनिचे विश्वस्तपद
By admin | Published: December 11, 2015 02:30 AM2015-12-11T02:30:46+5:302015-12-11T02:30:46+5:30
शनीच्या चौथऱ्यावर जाऊन एका तरुणीने पूजा केल्यावर सर्वत्र काहूर उठले होते. या घटनेनंतर लगेचच शनिदेवाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आम्हाला शनिदेवाची सेवा करण्याची संधी मिळावी
सोनई (जि. अहमदनगर) : शनीच्या चौथऱ्यावर जाऊन एका तरुणीने पूजा केल्यावर सर्वत्र काहूर उठले होते. या घटनेनंतर लगेचच शनिदेवाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आम्हाला शनिदेवाची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी भूमिका घेत शिंगणापूरमधील अनेक महिलांनी विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे हे धाडसी पाऊल ठरण्याची चिन्हे आहेत.
शनिशिंगणापूरच्या देवस्थानचे विश्वस्त होता यावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चारित्र्य पडताळणी करण्यासाठी इच्छुकांचे हेलपाटे सुरू झाले आहेत. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आदी अनेक कागदपत्रांसाठी हे इच्छुक धावाधाव करीत आहेत.
शिंगणापूरला उच्चभ्रू घरातील अनेक महिला भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. यासाठी महिला विश्वस्त असावेत, असा विचार
करीत दरंदले, बानकर, शेटे, लांडे
या घरातील महिलांनी विश्वस्तपदासाठी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.
देवस्थान परिसरात महिला सुरक्षा कर्मचारी आहेत, महिला पोलीस आहेत. मग महिला विश्वस्त का नाहीत, असा प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नियमावलीत विश्वस्तपदासाठी अर्ज भरणाऱ्या व्यक्ती असे म्हटले आहे. पुरुष अथवा महिला असे स्पष्टपणे म्हटलेले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत या महिलांना विश्वस्तपद मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
>>> लोकशाही प्रक्रियेत सर्वांना समान अधिकार आहेत. त्यामुळे शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदाच्या निवड प्रक्रियेत महिलाही अर्ज भरू शकतात, मुलाखती देऊ शकतात. त्यामुळे यात कोणाची काहीच हरकत नसावी. उलट महिला आल्या तर काही विश्वस्त जबाबदारीने वागतील.
- उदयकुमार बल्लाळ, कार्यकारी अधिकारी, शिंगणापूर देवस्थान