देशातील कर्तृत्ववान महिला साधणार संवाद
By admin | Published: November 19, 2015 01:09 AM2015-11-19T01:09:35+5:302015-11-19T01:09:35+5:30
कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी ‘लोकमत माध्यम समूहा’तर्फे कलर्स प्रस्तुत एईसीसीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या
लोकमत वूमन समिट २0१५ : कलर्स प्रस्तुत, एनईसीसीच्या सहकार्याने उपक्रम
पुणे : कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी ‘लोकमत माध्यम समूहा’तर्फे कलर्स प्रस्तुत एईसीसीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत वूमेन समिट’ या चळवळीचे पाचवे पर्व रविवारी (दि. २२) पुण्यात रंगणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे. ‘परिवर्तन, द न्यू एज वूमेन’ या संकल्पनेवर आधारित या समिटमध्ये या मान्यवर महिला संवाद साधणार आहेत. पंकजा मुंडे, प्रिया नाईक, शैली चोप्रा, निर्मला कांदळगावकर अशा दिग्गजांची मांदियाळी परिषदेचे भूषण ठरणार आहे. याशिवाय देशातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिला संवाद साधणार आहे. अधिक माहितीसाठी
वाचत राहा लोकमत.
प्रिया नाईक : मोठ्या संस्था, दाता संस्था; तसेच व्यक्तींनी स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रिया नाईक यांनी ‘संहिता’ या संस्थेची २००९ मध्ये स्थापना केली. इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. एस. राघवन यांचा ‘संहिता’ला पूर्ण पाठिंबा आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, विविध योजनांची अंमलबजावणी करावी आणि त्यातून होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करावे, यासाठी ‘संहिता’ पुढाकार घेते. यासाठी स्वयंसेवी संस्थांचा हातभार लागल्यास, सामाजिक उपक्रम अतिशय परिणामकारकपणे राबविले जातील, या कल्पनेतून प्रिया नाईक यांनी अनोख्या संकल्पना राबविल्या आहेत. ‘संहिता’ स्थापन होण्यापूर्वी प्रिया कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना सवलतीच्या दरात शिक्षण देणाऱ्या ‘द स्पार्क’ या संस्थेसाठी काम करत. केंब्रिज येथील एमआयटी संस्थेच्या पॉवर्टी अॅक्शन लॅबमध्ये संशोधनाचे काम करत असताना, सामाजिक उद्योजकतेची कल्पना प्रिया यांच्या डोक्यात आकार घेत होती. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा अनोखा उपक्रम कौतुकास्पद आहे.
शैली चोप्रा :
शैली चोप्रा या भारतातील आघाडीच्या संपादक आणि सादरकर्र्त्या आहेत. त्यांनी आजपर्यंत परिणामकारक आणि उत्पादनशील पत्रकारिता केलेली आहे. ईटी नाऊ, इकॉनॉमिक टाइम्स व्यावसायिक वृत्तवाहिनी येथे त्यांनी वरिष्ठ संपादक आणि आघाडीच्या वृत्तनिवेदक म्हणून काम पाहिले आहे. एनडीटीव्ही प्रॉफिट या वाहिनीची घडी बसवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. २०१२ मध्ये बिझनेस पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शैली यांना रामनाथ गोयंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१० मध्ये त्यांना मीडिया फाउंडेशनचा उत्कृष्ट वृत्तनिवेदक पुरस्कार, तर फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीचा ‘यंग वूमन अचिव्हर्स‘ हाही पुरस्कार मिळाला. २००८ मध्ये वॉशिंग्टनमधील जी-२० परिषद, २०११ आणि २०१२ मधील जर्मनी, डेव्होसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील द्विपक्षीय संवाद, अशा कार्यक्रमांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली. ‘बिग कनेक्ट-पॉलिटिक्स इन द एज आॅफ सोशल मीडिया’ हे पुस्तक शैली चोप्रा यांनी केले आहे. ‘शी द पीपल डॉट टीव्ही’ या अनोख्या प्रकल्पाचे; तसेच एका पुस्तकाचे काम त्यांनी सध्या हाती घेतले आहे. शैली चोप्रा यांनी आजपर्यंत वॉरेन बफे, जॉर्ज सोरॉस, टायगर वूडस, गॅरी प्लेयर, विक्रम पंडित, डॉ. अमर्त्य सेन, मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह बॉलमर, अंशु जैन, आनंद महिंद्रा, कुमार मंगलम बिर्ला, मुकेश अंबानी, राहुल बजाज, सुनील मित्तल अशा दिग्गजांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत.
निर्मला कांदळगावकर : या विवम अॅग्रोटेक या कंपनीच्या संचालिका आहेत. ही कंपनी घनकचरा व्यवस्थापनाचे काम करते. शेतीमध्ये रासायनिक खते मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो. रासायनिक खतांच्या वापरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्याचे कांदळगावकर यांच्या लक्षात आले. जमिनी सुपीक करण्यासाठी गांडूळखत वापरणे आवश्यक आहे, हे त्यांच्या लक्षात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक खत तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धती अपुऱ्या पडतात. त्या पद्धतीत अनेक तोटे असल्यामुळे व शेतकऱ्यांना नीट मार्गदर्शन न मिळाल्यामुळे, पारंपरिक पद्धतीतून गांडूळखत मोठ्या प्रमाणावर तयार होत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीतील तोटे दूर करून, निर्मलाजींनी ‘स्वरूप’ या गांडूळखत सयंत्रांची निर्मिती केली. २००१ मध्ये निर्मला कांदळगावकर यांनी ‘विवम अॅग्रोटेक’ या कंपनीची स्थापना केली. तंत्रज्ञानाचा वापर करून, कंपनीने बायोडिग्रीडेबल वेस्टपासून ऊर्जानिर्मितीचे तंत्र हाती घेतले आहे. निर्मलाजींनी पर्यावरण विज्ञानातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्याआधी त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी संपादन केली. मात्र, सामाजिक कार्याच्या आवडीने त्यांनी या व्यवसायात पदार्पण केले. त्यांनी बनवलेल्या गांडूळखत संयंत्राच्या साहाय्याने एका महिन्यात १ ते १.५ टन गांडूळखत बनविता येते. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, उत्तरांचल, गुजरात, गोवा आणि दिल्ली या ठिकाणी हा व्यवसाय विस्तारला आहे. त्यांना २०१० मध्ये ‘अवनी मित्र’, २०१३ मध्ये ‘पुण्यरत्न’, २०१४ मध्ये ‘चाणक्य पुरस्कार’, २०१५ मध्ये वूमन सुपर अचिव्हर अॅवॉर्ड असे अनेक सन्मान मिळाले.
पंकजा मुंडे : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण; तसेच ग्रामीण विकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात. त्यांचे बीएससी, एमबीए असे शिक्षण झाले आहे. पंकजा मुंडे यांना वाचन व सामाजिक कार्य यांचे छंद आहेत. दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाली असताना, राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्य़ांत बीडचा समावेश केला नाही म्हणून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह आमदार पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मुंडे यांनी वैजनाथ सर्वांगीण विकास संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता बचत गट स्थापन केले. या माध्यमातून महिलांना रोजगार व अर्थसाह्य उपलब्ध करून दिले. भटक्या, विमुक्त व इतर मागास समाजातील; तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील लोकांना सतत साह्य, ऊसतोड कामगारांच्या उन्नतीसाठीही प्रयत्न केले.