‘अंबाबाई’ गाभाऱ्यात महिलांचा प्रवेश
By Admin | Published: April 12, 2016 02:02 AM2016-04-12T02:02:17+5:302016-04-12T02:02:17+5:30
गेल्या आठ दिवसांपासून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाला सोमवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. प्रातिनिधीक स्वरूपात विविध
कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाला सोमवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. प्रातिनिधीक स्वरूपात विविध संघटनांच्या सात महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करून अंबाबाईची ओटी भरली व स्त्री-पुरुष समानतेच्या परंपरेचे दर्शन घडविले. परंतु महिलांचा गाभाऱ्यातील प्रवेश हा सोमवारी एक दिवसापुरताच असून कायमस्वरुपी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार का, याबद्दल मात्र संभ्रमावस्था आहे. रोज सकाळी ७ ते ८ या वेळेतच फक्त महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
कोल्हापुरातील विठ्ठल मंदिर आणि जुना राजवाडा पोलिस ठाणे याठिकाणी स्त्री-पुरुष समता समिती, अंबाबाई भक्त मंडळ आणि टोलविरोधी कृती समिती यांच्यात सोमवारी सुमारे पाच तासांत झालेल्या तीन बैठकानंतर अखेर प्रातिनिधीक स्वरूपात विविध संघटनांच्या दहा महिलांना अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास संबंधित महिला मंदिराच्या आवारात दाखल झाल्या. त्यांनी शनिमंदिराजवळील प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर संबंधित महिलांपैकी दोन महिला चुडीदार घालून होत्या म्हणून त्यांना वगळून अन्य सात महिलांना ५ वाजून २२ मिनिटांनी गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. त्यांनी अंबाबाईची ओटी भरून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘शाहू-फुले-आंबेडकरांचा विजय असो’, ‘स्त्री-पुरुष समानतेचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. यावेळी सतीशचंद्र कांबळे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, सुरेश जरग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चुडीदार म्हणून विरोध..
एकाबाजूला महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो म्हणून आनंद व्यक्त होत असताना पुन्हा महिलांच्या कपड्यावरून त्यांना या प्रवेशापासून रोखण्यात आले. डॉ. मीनल जाधव, अरुणा माळी यांनी चुडीदार घातला होता. साडी नेसली नसल्यामुळे तुम्हाला गाभाऱ्यात जाता येणार नाही, अशी भूमिका घेत त्यांना रोखण्यात आले.
या महिलांनी केला प्रवेश
सीमा पाटील (अंधश्रद्धा निर्मूलन समिती),स्नेहल कांबळे, (भारतीय महिला फेडरेशन), आरती रेडेकर (आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन), सुवर्णा तळेकर (लाल निशाण पक्ष लेनिनवादी), दीपा पाटील, वैशाली महाडिक (सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती), रुपाली कदम (पानसरे विचार मंच) यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत मीना चव्हाण, डॉ. मीनल जाधव, अरुणा माळी, ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मोरे होत्या.
सद्यस्थिती काय होती...?
अंबाबाई मंदिरात १५ एप्रिल २०११ ला तत्कालीन मनसेचे आमदार राम कदम यांनी गाभाऱ्यात जाण्याचे आंदोलन केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनीही महिलांसह विरोध मोडून गाभाऱ्यात प्रवेश केला होता. परंतु त्यावेळीही हा प्रवेश कांही दिवसांपुरताच राहिला.
पुन्हा देवीच्या गाभाऱ्याच्या चांदीच्या उंबऱ्यापर्यंतच सर्वसामान्य महिला व पुरुषांना सोडण्यात येत होते. गाभारा लहान आहे व देवीच्या अंगावर किंमती दागिने असल्याचे कारण सांगून आत जावू दिले जात नव्हते. त्याला फक्त राजघराण्यातील महिलांचाच अपवाद होता.
भद्रकाली ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी कोल्हापुरात महिलांना करवीरनिवासिनी अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश देऊन येथील महिला-पुरुषांनी नवा पायंडा पाडला आहे; शिवाय कोल्हापुरात स्त्री-पुरुष समानता असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.
- सीमा पाटील,
अंनिसच्या कार्यकर्त्या
राजर्षी शाहूंच्या करवीरनगरीमध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. काही कारणास्तव अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता पण, आता समन्वय व समझोत्याने महिलांना प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे इतरांनी आम्हाला शहाणपण शिकविण्याची गरज नाही.
- सुवर्णा तळेकर,
लाल निशाण पक्ष लेनिनवादी