शनिचौथऱ्यावर महिलांचा प्रवेश
By admin | Published: December 24, 2015 02:17 AM2015-12-24T02:17:49+5:302015-12-24T02:17:49+5:30
शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशावरून वादंग माजले असतानाच साताऱ्यातील सोळशी येथील प्रसिद्ध शनिमंदिराच्या चौथऱ्यावर साताऱ्याच्या महिलांनी बुधवारी प्रवेश केला.
सातारा : शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशावरून वादंग माजले असतानाच साताऱ्यातील सोळशी येथील प्रसिद्ध शनिमंदिराच्या चौथऱ्यावर साताऱ्याच्या महिलांनी बुधवारी प्रवेश केला. शांततेत झालेल्या या आंदोलनात ‘महिलांना प्रवेश बंद’ असे लिहिलेला फलक या महिलांनी काढून टाकला.
राज्य महिला लोक आयोग या संघटनेच्या सदस्यांनी सोळशीच्या शनिमंदिरात जाऊन चौथरा प्रवेशासाठी आंदोलन करण्याचे ठरविले होते. शनिमंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी या प्रवेशाला विरोध दर्शविला होता; मात्र चौथऱ्यावर जाण्यापासून आंदोलकांना रोखणार नाही, अशी भूमिका शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांनी घेतली होती. महिला मठात पोहोचताच हळदी-कुंकू आणि ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. चौथऱ्यावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी नंदगिरी महाराजांनी महिलांशी संवाद साधला. नेतृत्व करणाऱ्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी राज्यघटनेतील उपासना स्वातंत्र्याचा उच्चार करून प्रतिवाद केला. त्यानंतर दहा महिला शनीच्या चौथऱ्याकडे वळल्या. दहा वाजता महिलांनी चौथऱ्यावर प्रवेश केला. चौथऱ्यावर महिला सुमारे दहा मिनिटे बसून राहिल्या. हात जोडून उपासना केली. (प्रतिनिधी)