सोळशीत शनिचौथऱ्यावर महिलांचा प्रवेश
By admin | Published: December 23, 2015 10:07 PM2015-12-23T22:07:12+5:302015-12-23T22:07:12+5:30
शांतीत क्रांती : किरकोळ वादावादीनंतर आंदोलकांनी काढला ‘मज्जाव’चा फलक
सातारा : शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशावरून वादंग माजले असतानाच सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील प्रसिद्ध शनिमंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करून साताऱ्याच्या महिलांनी बुधवारी क्रांती घडविली. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता शांततेत झालेल्या या आंदोलनात ‘महिलांना प्रवेश बंद’ असे लिहिलेला फलक आंदोलकांनी काढला.
राज्य महिला लोक आयोग या संघटनेच्या सदस्यांनी सोळशीच्या शनिमंदिरात जाऊन चौथरा प्रवेशासाठी आंदोलन करण्याचे ठरविले होते. शनिमंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी या प्रवेशाला विरोध दर्शविला होता; मात्र चौथऱ्यावर जाण्यापासून आंदोलकांना रोखणार नाही, अशी भूमिका शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांनी घेतली होती. स्त्रीत्वाचा सन्मान राखून आपण केवळ महिलांना समजावून सांगू, असा शब्द त्यांनी दिला होता. महिला मठात पोहोचताच त्यांचे देवस्थानच्या वतीने स्वागत केले. हळदी-कुंकू आणि ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर चौथऱ्यावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी नंदगिरी महाराजांनी महिलांशी मवाळ भाषेत संवाद साधला आणि धर्मशास्त्राचे, धर्मग्रंथांचे संदर्भ दिले.
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी भारतीय राज्यघटनेनुसार असलेल्या उपासना स्वातंत्र्याचा उच्चार करून प्रतिवाद केला. ‘अन्य धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांमध्येही महिलांनी जावे,’ या नंदगिरी महाराजांच्या आवाहनावर बोलताना अॅड. देशपांडे म्हणाल्या, ‘मी हिंदू आहे आणि माझ्या धर्मात स्त्री-पुरुष समानता आणणे हे माझे काम आहे. अन्य धर्मांतील महिलांच्या उपासना स्वातंत्र्यालाही आमचा पाठिंबा आहे.’ यानंतर संघटनेच्या दहा महिला आंदोलक शनीच्या चौथऱ्याकडे वळल्या.
‘महिलांनी येथूनच बाहेर पडावे,’ असे लिहिलेला फलक चौथऱ्याच्या अलीकडे लावला होता, तो आंदोलकांनी काढून टाकला. बरोबर दहा वाजता महिलांनी चौथऱ्यावर प्रवेश केला. चौथऱ्यावर महिला सुमारे दहा मिनिटे बसून राहिल्या. हात जोडून उपासना केली. त्यानंतर चौथऱ्याच्या आजूबाजूला असलेल्या मज्जाव फलकावरून विश्वस्त आणि आंदोलकांमध्ये खटके उडाले; मात्र ‘नोंदणीकृत ट्रस्टला असे घटनाबाह्य फलक लावता येत नाहीत,’ असे सांगून अॅड. वर्षा देशपांडे यांनी कायद्यावर बोट ठेवताच विरोध मावळला. (प्रतिनिधी)
इकडे समूहगीत,
तिकडे शुद्धिकरण!
आंदोलन यशस्वी झाल्यावर महिलांनी शनैश्वर देवस्थानच्या प्रवेशद्वाराजवळ डफाच्या तालावर समूहगीत गायिले, तर त्याच वेळी देवस्थानच्या बाल-सेवेकऱ्यांनी चौथरा गोमूत्राने पवित्र करून पाण्याने धुतला. ‘अगं बाई धर्माचा ह्यो किल्ला, कोणत्या भक्ताने बांधिला,’ असे गीत महिला गात होत्या, तर चार सेवेकरी ओलित्याने शनीचा चौथरा ‘शुद्ध’ करीत होते. वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. (संबंधित वृत्त हॅलो १ वर)