बुलडाण्यात महिलांचा ‘आडवी बाटली योग’
By admin | Published: June 22, 2016 04:10 AM2016-06-22T04:10:14+5:302016-06-22T04:10:14+5:30
द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी हातात दारुच्या रिकाम्या बाटल्या घेऊन योगासने केली
अमोल ठाकरे , बुलडाणा
द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी हातात दारुच्या रिकाम्या बाटल्या घेऊन योगासने केली. दारूबंदी होत नाही तोपर्यंत योग दिवस साजरा करण्यात अर्थ नाही, अशा घोषणा देत महिलांनी केलेल्या या अनोख्या ‘योग आंदोलना’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अस्तित्व महिला संघटनेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात दारूबंदीची मागणी केली जात आहे. यासाठी जिल्हा पातळीसह नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यानही आंदोलने करण्यात आली; तरीही या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मंगळवारी योग दिनाचे औचित्य साधून संघटनेतर्फे अनोख्या आंदोलनाने दारू विक्रीचा निषेध करण्यात आला. संपूर्ण राज्यातच नाही, तर देशभरात दारूबंदी करा, अशा मागणीचे निवेदन या वेळी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.