महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By Admin | Published: December 16, 2014 01:07 AM2014-12-16T01:07:44+5:302014-12-16T01:07:44+5:30
स्थानिक वडाळी येथील बंद असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध नोंदविण्यासाठी सोमवारी महिला आंदोलकांनी येथील राज्य उत्पादक शुल्क
अमरावतीतील दारु दुकानाचा प्रश्न : मतदान घेण्यास विरोध
अमरावती : स्थानिक वडाळी येथील बंद असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध नोंदविण्यासाठी सोमवारी महिला आंदोलकांनी येथील राज्य उत्पादक शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली. देशी दारुचे दुकान सुरु करण्यासाठी पुन्हा मतदान घेतले तर कायदा हातात घेऊ, असा इशारा देखील महिलांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा, सुव्यवस्थेबाबत न्यायालयात वस्तुस्थिती कळविली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर महिलांचा आक्रोश कमी झाला, हे विशेष.
अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न
आंदोलक महिलांनी येथील एक्साईजचे कार्यालय गाठताच निरीक्षक एस.जे. ठाकूर यांना काळे फासण्याचा केला. मात्र ही बाब ठाकूर यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांशी बोलायचे आहे, असे सांगून कसेबसे दालनातून बाहेर पडले. नंतर त्यांच्या मदतीला धावून आलेले उपनिरीक्षक एस.एस. रंधे यांना महिलांनी कक्षातच रोखून धरले.
मतदान नकोच- जिल्हाधिकारी
सोमवारी जिल्हाधिकारी कक्षात झालेल्या चर्चेदरम्यान वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत मलाही मतदान प्रक्रिया नको आहे, अशी प्राजंळ कबुली जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आंदोलक महिलांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिली. येत्या दोन दिवसांत उच्च न्यायालयाला पत्र पाठवून मतदान नव्हे तर हे दुकान अन्य ठिकाणी हलविण्याचे कळविले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.