ग्लॅमरस ‘हॉटेल मॅनेजमेंट’
By admin | Published: May 30, 2016 02:07 AM2016-05-30T02:07:28+5:302016-05-30T02:07:28+5:30
हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे ‘जेवण बनवणे’ असा गैरसमज पूर्वी असायचा
मुंबई : हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे ‘जेवण बनवणे’ असा गैरसमज पूर्वी असायचा. पण आता हा गैरसमज पुरता दूर झाला आहे. या अभ्यासक्रमाला वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे. हॉटेलविश्व आणि खाद्यपदार्थांची आवड असलेल्यांसाठी ‘हॉटेल मॅनेजमेंट’चा अभ्यासक्रम उत्तम पर्याय आहे.
केवळ स्वयंपाकघरात काम करणे म्हणजे ‘हॉटेल मॅनेजमेंट’ या क्षेत्राविषयी असलेली चुकीची व्याख्या आता बदलली आहे. ग्लॅमर विश्वात वावरू पाहणाऱ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम एक पर्वणी आहे. पंचतारांकित हॉटेलांमध्ये विविध पदावर हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. या अभ्यासक्रमात स्वयंपाकघरापासून ते हॉटेलची स्वच्छता, सजावट, ग्राहकांशी वागणूक याविषयी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करणे अनिवार्य असते. यातूनच विद्यार्थ्यांना कोठे वळायचे हे कळते.
बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट विषयात बीए इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल अॅण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट, बीए इन हॉस्पिटॅलिटी सायन्स करू शकतात. हे अभ्यासक्रम ६ महिन्यांपासून ते ३ वर्षांपर्यंत असतात. यातून पदवी मिळविल्यानंतर अनेक अॅडव्हान्स कोर्सदेखील तुम्ही करू शकता; शिवाय या अभ्यासक्रमांसोबतच फूड प्रोडक्शन मॅनेजमेंट, डाएटिंग अॅण्ड न्युट्रीशन, हाउस किपिंग, फ्रंट आॅफिस आणि टुरिझम मॅनेजमेंट इ. विषयांत स्पेशलाईज स्टडी करू शकता.
>पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंटसाठी प्रवेश घेऊ शकतात. यासाठी २२ वर्षांची वयोमर्यादा आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा (लेखी) आणि मुलाखत घेतली जाते. लेखी परीक्षा २०० गुणांची असून, यात भाषा, सामान्य ज्ञान, गणितावर आधारित प्रश्न विचारले जातात. अनेक महाविद्यालयांत लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशनसाठी बोलावले जाते. या परीक्षेच्या गुणांवरून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.
>करिअरच्या संधी
अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पंचतारांकित हॉटेल्समध्ये, एअरलाइन्स फूड सर्विस विभागात, कॉर्पोरेट कँटीन, मॉल्स, मल्टीप्लेक्स, रेल्वेतील अन्न विभागात नोकरी मिळू शकते.
>हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था
अंजुमन-इस्लाम इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, सीएसटी
अथर्व कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, मालाड
भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे
आयटीएम इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, खारघर, नवी मुंबई