महिला कैद्यांचा होतो अनन्वित छळ
By admin | Published: July 14, 2017 06:10 AM2017-07-14T06:10:01+5:302017-07-14T06:10:01+5:30
भायखळा कारागृहात छोट्या-छोट्या गोष्टींवरून महिला कैद्यांचा अनन्वित छळ केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा कारागृहात छोट्या-छोट्या गोष्टींवरून महिला कैद्यांचा अनन्वित छळ केला जातो. त्यांच्यावर अमानवी अत्याचार केले जात असल्याची तक्रार महिला कैद्यांनी संसदेच्या महिला सशक्तीकरण समितीकडे केल्याचे पथकातील एका महिला खासदाराने ‘लोकमत’ला सांगितले.
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असून, संसदेच्या महिला सशक्तीकरण समितीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी भायखळा कारागृहाची पाहणी केली. आसामच्या खासदार बिजोया चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सुमारे ३० महिला खासदारांच्या पथकाने भायखळा कारागृहात महिला कैद्यांशी संवाद साधत त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, सुरक्षितता आदींची माहिती घेतली. या पथकात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, भाजपाच्या रक्षा खडसे आदींचा समावेश होता.
या खासदारांनी महिला कैद्यांसह कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली. कारागृहात महिला कैद्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, महिला कैद्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला.
यावेळी कैदी महिलांनी आपली कैफियत समितीपुढे मांडली. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणामुळे कारागृहाच्या भिंतीआड होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. महिला कैद्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न महिला खासदारांनी जाणून घेतले. यासंदर्भातील गोपनीय अहवाल तयार केला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार आहे, असे खा. रक्षा खडसे यांनी सांगितले.
>चौकशी समिती नेमली
मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा
२४ जून २०१७ रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून हत्येप्रकरणी जेलर मनीषा पोखरकर, महिला पोलीस शिपाई बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली. महिला आयोगानेही चौकशी समिती नेमली आहे.