महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 11:03 AM2021-09-25T11:03:08+5:302021-09-25T11:04:12+5:30
प्रख्यात स्त्रीवादी लेखिका आणि महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे आज पहाटे निधन झाले.
मुंबई: प्रख्यात स्त्रीवादी लेखिका आणि महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे आज पहाटे निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. महिला हक्क चळवळीच्या लढ्यात कमला भसीन यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. दक्षिण आशियातील स्त्रीवादी आंदोलनाला पुढे नेण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
काही महिन्यांपूर्वीच कमला भसीन यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. कमला यांच्या क्योंकि मै लडकी हू, मुझे पढना है या कविता विशेष लोकप्रिय होत्या. १९७० च्या दशकापासून कमला भसीन भारतातील तसेच अन्य दक्षिण आशियाई देशांमध्ये महिलांच्या चळवळीतला एक प्रमुख आवाज आहे. २००२ मध्ये त्यांनी स्त्रीवादी नेटवर्क ‘संगत’ ची स्थापना केली, जी ग्रामीण आणि आदिवासी समाजातील वंचित स्त्रियांसोबत काम करते, बहुतेकदा नाटक, गाणी आणि कला यांसारख्या साधनांचा वापर करते.
जागो री चळवळ चालवणाऱ्या कमला भसीन यांनी महिलांसाठी पहिला लढा हा त्यांना पितृसत्ताक समजातून बाहेर काढणे असल्याचे म्हटले होते. पुरुषांनी काही काळ नोकरी केली नाही तर मुलांच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही. तुमच्या पत्नीने एक दिवस काम केले नाही तर जीवन आणि मृत्यूवर प्रश्न उपस्थित होतो, असेही त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.
कमला भसीन यांचा जन्म २४ एप्रिल १९४६ रोजी झाला होता. एक स्त्रीवादी कार्यकर्ती, कवयित्री, लेखिका अशी त्यांची ओळख होती. भसीन यांनी लिंग सिद्धांत, स्त्रीवाद आणि पितृसत्ता समजून घेण्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी अनेक ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित केली गेली आहेत.