फेसबुक दिंडीत मांडणार ‘स्त्रियांचा संघर्ष’
By Admin | Published: June 11, 2017 03:44 AM2017-06-11T03:44:41+5:302017-06-11T03:44:41+5:30
संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा व संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याची इत्थंभूत माहिती इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या
- प्रशांत ननवरे । बारामती
संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा व संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याची इत्थंभूत माहिती इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या ७ वर्षांपासून कार्यरत आहे. फेसबुक दिंडी नेहमीच वारीच्या अपडेटसोबतच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेते. गतवर्षी जलजागृती या विषयावर काम करणारी ही दिंडी यंदा ‘स्त्रियांचा संघर्ष’ मांडणार आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह स्त्रियांसाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या महिलांना यामध्ये सहभागी करण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत टीम फेसबुक दिंडी, गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या, बाललैंगिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, मासिकपाळी समज-गैरसमज, बालविवाह, हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, विधवांच्या समस्या, रूढी आणि परंपरामध्ये अडकलेल्या स्त्रिया, वारकरी संप्रदायातील स्त्रीसंतांचे कार्य, स्त्रीअभिव्यक्ती, कर्तृत्ववान स्त्रिया आदी विषय घेऊन समाजासमोर काही प्रश्न उपस्थित करणार आहे. ज्याची उत्तरे समाजानेच द्यायची आहेत या विषयावर चर्चा घडवून आणायची आहे.
यंदा फेसबुक दिंडी ‘ती आणि तिचा संघर्ष’ मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पंढरीची वारी म्हणजे विठ्ठलाला भेटण्याची वारकऱ्याची आस, पंढरपूरपर्यंत केलेला संघर्षमय प्रवास, वारी तिच्या अभिव्यक्तीची, वारी तिच्या जाणिवांची, वारी तिच्या संघर्षाची, वारी तिच्या अस्तित्वाची, वारी तिच्या मुक्तीची, वारी तिच्या स्त्रीत्वाची, वारी तीची... या अभियानातून फेसबुक दिंडी ती आणि तिचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
संघर्ष गर्भात असल्यापासूनच सुरू होतो. तिथेच तिच्या अस्तित्वावर गर्भलिंगनिदान चाचणीच्या माध्यमातून बोट ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून स्त्रीची कधीही न संपणारी वारी सुरू होते. समाज सुशिक्षित झाल्याचा दावा आजही केला जातो. मात्र, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, हुंड्यासाठी छळ, लैंगिक अत्याचार असे अनेक प्रकार आजही घडत आहेत. त्यामध्ये वाढच होत आहे. यासाठी फेसबुक दिंडी टीमचे सदस्य स्वप्निल मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर, ओंकार महामुनी कार्यरत आहेत.
फेसबुक दिंंडीचे संस्थापक स्वप्निल मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की या विषयावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह वर्षा देशपांडे, विद्या बाळ, अॅड. असीम सरोदे, अॅड. रिमा सरोदे आदी स्त्रियांसाठी काम करणाऱ्या सुमारे २० महिला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या महिलांशी संवाद साधण्यात आला आहे.
दोन गावांमध्ये ओढा खोलीकरण...
गतवर्षी फेसबुक दिंडी आणि एनव्हायर्नमेंटल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या जलसंधारण अभियानांतर्गत मौजे बऱ्हाणपूर आणि मौजे कारखेल (ता. बारामती) या दोन गावांमध्ये ओढा खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आली. त्यानंतर यंदा ‘स्त्रियांचा संघर्ष’ या विषयाशी संबंधित फेसबुक दिंडी अभिनव उपक्रम घेऊन येत आहे.