आश्रमशाळांत महिला अधीक्षिका पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 03:24 AM2017-01-17T03:24:16+5:302017-01-17T03:24:16+5:30

खालापूर तालुक्यातील डोलवली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तीन दिवसांपूर्वी किरकोळ आजाराने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.

Women's Superintendent posts vacant in ashram schools | आश्रमशाळांत महिला अधीक्षिका पदे रिक्त

आश्रमशाळांत महिला अधीक्षिका पदे रिक्त

googlenewsNext

कांता हाबळे,

नेरळ- खालापूर तालुक्यातील डोलवली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तीन दिवसांपूर्वी किरकोळ आजाराने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील महिला अधीक्षिकापद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. तर एकूणच कर्जत तालुक्यातील पाचपैकी चार आश्रमशाळेत महिला अधीक्षिका नसल्याचे उघड झाले आहे.
कर्जत तालुक्यात भालीवडी, पिंगळस, पाथरज, कळंब, चाफेवाडी अशा पाच ठिकाणी शासकीय आणि माणगाववाडी येथे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहेत. तालुक्यातील विविध भागांतील आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी याठिकाणी निवासी शिक्षण घेतात. पिंगळस वगळता अन्य चार ठिकाणच्या आश्रमशाळेत बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी पुरु ष अधीक्षक आणि विद्यार्थिनींकडे लक्ष देण्यासाठी महिला अधीक्षिका यांच्या नियुक्त्या आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येतात. मोठ्या प्रमाणात मुली शिक्षण घेत असल्याने कायमस्वरूपी निवासी तत्त्वावर महिला अधीक्षिका यांचे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आश्रमशाळेतील मुलींच्या शारीरिक आरोग्य, शिक्षण,समुपदेशन, शारीरिक अडचणी, यांच्याविषयीची जबाबदारी दिलेली असते. ते पद त्यासाठीच निवासी ठेवण्यात आले असून मुली वयात आल्यानंतर त्यांच्या शरीरातील बदल यांची जाणीव करण्याची जबाबदारी महिला अधीक्षिका या पार पाडतात. परंतु आदिवासी आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका यांच्या नियुक्तीचा प्रश्न अनेक वर्षे कायम आहे.
भालीवडी येथे १00 टक्के मुलींची शासकीय आश्रमशाळा असून तेथील महिला अधीक्षकपद जानेवारी २०१४ पासून रिक्त होते. त्या ठिकाणी कळंब येथील शासकीय आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका यांना जून २०१६ मध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. चाफेवाडी आश्रमशाळेत अनेक वर्षे महिला अधीक्षिका पद रिक्त असून सध्या स्वयंपाकी महिला हा कार्यभार सांभाळत आहे. या पदासाठी पदवीनंतर एमएसडब्लू ही पदविका असलेल्या उमेदवाराला संधी राज्य सरकार देत असते. मात्र चाफेवाडीत जेमतेम सातवी शिकलेल्या स्वयंपाकी या महिला अधीक्षिका आहेत, हे दुर्दैव आहे. भक्ताची वाडी म्हणजे पिंगळस येथील आदिवासी आश्रमशाळेत देखील महिला अधीक्षिका यांचे पद आलटून पालटून स्थानिक शिक्षिका सांभाळत आहेत.
>मनुष्यबळाच्या अभावामुळे दुर्लक्ष
आश्रमशाळांच्या दुरवस्था, अपुऱ्या मनुष्यबळाबाबत कर्जत येथील दिशा केंद्राचे कार्यकारी संचालक अशोक जंगले यांनी जून २०१६ मध्ये राज्यपाल विद्यासागर राव यांचे लक्ष वेधले होते. आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका यांचे रिक्त पदे आणि याठिकाणी नियुक्त असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याबाबत रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
>डोलवली येथील किंवा कोणत्याही आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थी किरकोळ आजारी पडला तरी संबंधित सर्व शाळा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून पाल्य आजारी आहे असे कळवून आपली जबाबदारी झटकतात. मग डोलवली येथे मुलगी मृत झाल्यानंतर सांगितले याचा अर्थ पालकांना समजू शकला नाही. त्यामुळे पालक आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षणावर नाराज होत आहेत.
- अशोक जंगले, दिशा केंद्र
170 मुले-मुली शिकत असलेल्या आश्रमशाळेची जबाबदारी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या शिक्षिकेवर दिली आहे. त्या शिक्षिका निवासी नसल्याने केवळ तात्पुरत्या नियुक्तीवर असतात. पाथरज येथे कायमस्वरूपी महिला अधीक्षिका यांचे पद भरलेले आहे, पण तेथील शिक्षकवर्ग निवासी व्यवस्था असतानाही शहराच्या ठिकाणी राहण्यास प्राधान्य देत असल्याचे उघड झाले आहे. चाफेवाडी या आश्रमशाळेत सर्वच सरकारी नियम धाब्यावर बसवण्यात आले आहे.

Web Title: Women's Superintendent posts vacant in ashram schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.