वॉर्ड बॉयच झाले मुन्नाभाई एमबीबीएस!
By admin | Published: July 12, 2016 01:44 AM2016-07-12T01:44:19+5:302016-07-12T01:44:19+5:30
डॉक्टरांचे काम करताहेत वॉर्ड बॉय, आया, वॉर्ड बॉयऐवजी नातेवाइकांनाच ढकलाव्या लागतात स्ट्रेचर अन् व्हीलचेअर, पोलीस कक्ष आहे
पिंपरी : डॉक्टरांचे काम करताहेत वॉर्ड बॉय, आया, वॉर्ड बॉयऐवजी नातेवाइकांनाच ढकलाव्या लागतात स्ट्रेचर अन् व्हीलचेअर, पोलीस कक्ष आहे; मात्र पोलिसांचाच पत्ता नाही, प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असूनही ‘आओ जाओ तुम्हारा घर’, जखमेवर ड्रेसिंग आणि प्लॅस्टर करताहेत वॉर्डबॉय अशी धक्कादायक स्थिती महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली. या रुग्णालयात शहरासह मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड या तालुक्यांतीलही रुग्ण येथे दाखल होतात. त्यामुळे रुग्णांची संख्या अधिक असते. मात्र, कर्मचारी संख्या कमी असल्याने कोणतेही काम कोणीही करत असल्याचे स्टिंग आॅपरेशनमध्ये निदर्शनास आले.
ड्रेसिंग विभाग : सकाळी ११.००
ड्रेसिंग विभागाबाहेर (क्रमांक २६) ड्रेसिंग करण्यासाठी रुग्णांची मोठी रांग लागली होती. या विभागात सिस्टर किंवा ब्रदर नसल्याने त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या वॉर्ड आया (मावशा) रुग्णांना ड्रेसिंग करताना दिसून आल्या. दररोज एक मावशी किमान ५० रुग्णांना ड्रेसिंग करत असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांना आत सोडणे, टाके काढल्यावर ती जागा औषध टाकून पुसून घेणे, काय हवे नको ते पाहणे असे काम असणाऱ्या मावशांनाच ड्रेसिंग करावी लागत आहे. टाके काढण्याचे कामही त्याच मावशा करत असताना दिसल्या.
जनरल सर्जरी ओपीडी : स. ११.२०
जनरल सर्जरी ओपीडी येथे रुग्णांची रांग होती. सकाळी नऊ ते दुपारी एक अशी डॉक्टरांची वेळ व वार ठरवून दिलेली पाटी विभागाच्या बाहेरच लावण्यात आली आहे. मात्र, शिकाऊ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी सुरू होती. डॉक्टरांची
विचारणा केली असता, बाहेर बसणाऱ्या सेवकाने डॉक्टर राउंडला गेले आहेत; आता येतीलच, असे सांगितले. परंतु, दोन तास उलटून गेले तरीही डॉक्टर आले नाहीत.
केस पेपरसाठी रांगा : स. ११.२०
सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत रुग्णालयाचे संत तुकाराम प्रवेशद्वार सुरू असते. या प्रवेशद्वारातूनच सर्वांना आत व बाहेर सोडले जाते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आतील बाजूस केसपेपर काढण्यासाठीच्या खिडक्या आहेत. तासन्तास उभे राहूनही नागरिकांना खिडकीपर्यंत पोहोचता आले नाही. याच्याविरुद्ध बाजूला औषधे घेण्याचे ठिकाण आहे. तेथेही नागरिकांची मोठी रांग दिसून आली.
औषधवाटप कक्ष : दु. १२.००
औषधवाटपच्या ठिकाणाच्या बाजूला रक्त तपासणे, रिपोर्ट दाखविणे यासाठीचा कक्ष आहे. या कक्षात ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर कोणतेही कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे अनेकजण कक्षासमोर पेपर हातात घेऊन ताटकळत उभे होते. दुपारी बाराच्या सुमारास या कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर एक लहान मुलगी खेळत असताना दिसून आली.
अस्थिरोग विभाग : स. ११.५०
अस्थिरोग विभागात प्लॅस्टर रूम क्रमांक १२ मध्ये एक वॉर्ड बॉय रुग्णांचे प्लॅस्टर काढताना दिसून आला. अनेक दिवसांपासून तोच हे काम करीत असल्याचे त्याने सांगितले. एका लहान मुलाचे प्लॅस्टर त्याने यंत्राच्या साहाय्याने कापले, तर एका रुग्णाला प्लॅस्टरदेखिल त्यानेच केले. एका मागे एक अशी त्यांच्याकडेही रुग्णांची गर्दी होती.
कर्मचारी मोबाइलमध्ये दंग
रुग्णालयातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक बाकावर बसून मोबाइल वापरत होते़, तर दुसऱ्या बाजूला अनेक विभागांतील कर्मचारी मोबाइल काढून गेम खेळण्यात मग्न होते़
प्रवेशद्वार : सकाळी १०.३०
रुग्णालयातील संत तुकाराम प्रवेशद्वार इमारतीच्या मुख्य भागात पाणी गळत असल्यामुळे त्या ठिकाणी बादली ठेवून पाणीगळती थांबविण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यामुळे आजूबाजूला पाणी सांडल्याने मुख्य दरवाजातून प्रवेश करताच घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला होता.
पोलीस चौकी : दुपारी १२.०५
रुग्णालयातीलच तातडीक विभागाजवळ पोलीस चौकी आहे. मात्र, सोमवारी दुपारी या चौकीचा दरवाजा बंद होता. आतमध्ये कोणीही नव्हते. पोलिसांकडे काम असल्यास संबंधित व्यक्तीला त्यांची वाट पाहत बसावे लागते.
तातडीक विभाग : दु.१२.१०
या विभागात एकच सुरक्षारक्षक होता. या वेळी सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष ठेवणे आवश्यक असताना येथील सिस्टर त्यांना भलतीच कामे सांगत होत्या. डॉक्टरकडून चिठ्ठी लिहून द्या, रुग्णाला त्यांचा वॉर्ड दाखवा, अशा प्रकारचे आदेश सिस्टर सोडत होत्या. याच विभागात काही वेळातच एका रुग्ण महिलेला व्हीलचेअरवरून घेऊन त्यांचे वृद्ध नातेवाईक या विभागात आले. जास्त वय असल्याने त्या आजोबांना चेअर ढकलणेदेखील जमत नव्हते. मात्र, वॉर्डबॉयच उपलब्ध नसल्याने आजोबांना चेअर ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.
जनरल महिला विभाग : दु. १२.३०
या विभाग बाहेर सुरक्षारक्षक होते. त्यांच्यासमोर नोंदणी रजिस्टरही ठेवण्यात आले होते. मात्र, आतमध्ये जाणाऱ्या व्यक्तींची कसलीही चौकशी केली जात नव्हती. आत जाणारी व्यक्ती खरच नातेवाईक आहे, की नाही याची खातरजमा केली जात नव्हती.
प्रसूती विभाग : दु. १२.४५
प्रसूती झाल्यानंतर आॅपरेशन थिएटरमधून महिला व बाळास या ठिकाणी आणले जाते. या विभागाबाहेर एक महिला सुरक्षारक्षक उपस्थित होत्या. अॅडमिट असणाऱ्या पेशंटची यादी प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आली होती. फक्त पेशंटच्याच नातेवाइकांना विभागात सोडले जात होते.
एक्स-रे विभाग : दु. १.०९
या विभागात एक्स-रेच्या चार मशिन आहेत. मात्र, त्यातील तीन बंद असल्याने एकाच मशिनद्वारे एक्स-रेचे कामकाज केले जाते. त्यामुळे रुग्णांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. सोमवारी एक्स-रेसाठी रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. काही रुग्ण, तर स्ट्रेचरवरच आणून ठेवले होते.
सोनोग्राफी विभाग : दु. १.२५
या विभागात सोनोग्राफीसाठी येणाऱ्यांमध्ये गर्भवती महिलांची संख्या अधिक असते. मात्र, या विभागाच्या प्रवेशद्वारातच पाण्याची गळती होत आहे. हे पाणी फरशीवर पसरत असल्याने पाय घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दूरध्वनी दोन दिवसांपासून बंद
रुग्णालयातील प्रमुख यंत्रणापैकी असणारी दूरध्वनी यंत्रणा दोन दिवसांपासून बंद असल्यामुळे नातेवाइकांनी दूरध्वनी करून केलेल्या रुग्णांच्या चौकशीबाबत उत्तर मिळत नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत होते.
ओळखपत्राचा वापर नाही
कामाच्या ठिकाणी ओळखपत्राचा वापर बंधनकारक आहे़ रुग्णालयात अनेक डॉक्टर, तसेच कर्मचारी ओळखपत्र परिधान करीत नाहीत़ त्यामुळे कर्मचारी आणि डॉक्टर कोण आहेत याबाबत नागरिकांचा गोंधळ उडतो.
चौकशी कक्षाला वालीच नाही
शहरातील वाय़सी़एम़ रुग्णालयात उपचारासाठी ग्रामीण भागातील अनेक लोक येत आहे़त. त्यांना योग्य माहिती देण्यासाठी रुग्णालयात चौकशी कक्ष आहे़ परंतु त्या कक्षातील कर्मचारी जागेवर नसल्याने, लोकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ससेहोलपाट होत आहे़
वॉर्ड शोधताना कसरत
रुग्णालयात प्रत्येक विभागाला विशिष्ट क्रमांक दिला आहे़ परंतु नवीन रुग्णाला अथवा त्याच्या नातेवाइकाला एखाद्या विभागात जायचे असल्यास कर्मचाऱ्यांकडून त्या विभागाचा क्रमांक सांगितला जातो़ परंतु तो क्रमांक आणि विभाग शोधताना रुग्णाच्या नातेवाइकांना कसरत करावी लागते.
रुग्णवाहिकेच्या रस्त्यात पार्किं ग
रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज ऐकल्याबरोबर रस्ते मोकळे होतात़ मात्र वायसीएम रुग्णालयाच्या तातडीक विभागाकडे येणाऱ्या रस्त्यावर ठरावीक डॉक्टर आणि नातेवाइकांच्या भेटीला आलेले राजकीय पदाधिकारी आपल्या मोटारी या रस्त्यातच उभ्या करीत आहे़त.जर अचानक आलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता मिळाला नाही, तर रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो़