जिगरबाज..कौतुकास्पद..! सोसाट्याचा वारा, जोरदार बर्फवृष्टीत कांचनजुंगा सर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:11 PM2019-05-16T13:11:09+5:302019-05-16T13:20:03+5:30

एकाच संस्थेतील १० गिर्यारोहकांनी कांचनजुंगा शिखर चढाई करणे, असे गिर्यारोहणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडत आहे. 

wonderful.. courageous..! kanchenjunga trek successful in Strongly wind and snowful | जिगरबाज..कौतुकास्पद..! सोसाट्याचा वारा, जोरदार बर्फवृष्टीत कांचनजुंगा सर... 

जिगरबाज..कौतुकास्पद..! सोसाट्याचा वारा, जोरदार बर्फवृष्टीत कांचनजुंगा सर... 

googlenewsNext
ठळक मुद्देगिरीप्रेमीचे यश : एकाच संस्थेतील १० जणांची प्रथमच शिखर चढाई 

पुणे : सोसाट्याचा वारा, जोरदार बर्फवृष्टीमुळे मोहिमेत अडथळे आले. तरीही गिरीप्रेमी संस्थेतील १० गिर्यारोहकांनी तब्बल १२ ते १३ तासांच्या अथक चढाईनंतर भारतीय वेळेनुसार सकाळी साडे पाच ते सहा च्या दरम्यान कांचनजुंगावर भारतीय तिरंगा व महाराष्ट्राचा भगवा फडकाविला. एकाच संस्थेतील १० गिर्यारोहकांनी कांचनजुंगा शिखर चढाई करणे, असे गिर्यारोहणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडत आहे. 
गिरीप्रेमीचा १० जणांचा संघ कॅम्प २ (उंची ६३०० मीटर) साठी ११ मे रोजी सकाळी  रवाना झाला होता. त्या दिवशी तेथेच थांबून थांबून १२ मे रोजी कॅम्प ३ कडे चढाई करायची, अशी योजना होती. मात्र, जोरदार बर्फवृष्टीमुळे व सोसाट्याच्या  वाऱ्यामुळे १२ मे ची रात्र देखील संघाला कॅम्प २ वरच काढावी लागली. १३ मे ला सकाळी हवामानाचा अंदाज घेऊन सर्व जण कॅम्प ३(उंची ६९०० मीटर) च्या दिशेने चढाईसाठी निघाले. दुपारच्या सुमारास कॅम्प ३ ला पोहोचले. 


 १४ मे ला सकाळी कॅम्प ४ गाठणे (उंची: अंदाजे ७४०० ते ७५०० मीटर) व संध्याकाळी कॅम्प ४ हून शिखरमाथ्याकडे रवाना होणे, अशी योजना आखली होती. त्यानुसार १४ मे दुपारी १२ च्या सुमारास सर्व जण कॅम्प ४ ला पोहोचले. कॅम्प ३ नंतर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण विरळ होत जाते, त्यामुळे काही जणांना ऑक्सिजन मास्क लाऊन चढाई करावी लागते. मात्र, गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांचे अक्लमटायझेशन उत्तम झाले असल्याने सर्वांनी कॅम्प ३ ते कॅम्प ४ ही चढाई सावकाश पण विना ऑक्सिजन मास्क केली. यामुळे अतिउंचावरील हवामानाशी एकरूप होण्यास अधिक मदत झाली. 
 १४ मे च्या संध्याकाळी ५ वाजता सर्वांनी कॅम्प ४ सोडले. कॅम्प ४ ते शिखरमाथा ते पुन्हा कॅम्प ४ हा खूप मोठा प्रवास आहे. यासाठी तब्बल २४ ते २६ तास लागू शकतात. एव्हरेस्ट चढाईच्या वेळी हाच प्रवास १४ ते १७ तासात पूर्ण होतो. यामध्ये गिर्यारोहकाचा मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीचा कस लागतो. तब्बल १२ ते १३ तासांच्या अथक चढाईनंतर भारतीय वेळेनुसार सकाळी साडे पाच ते सहा च्या दरम्यान गिरिप्रेमीच्या दहाही शिलेदारांनी कांचनजुंगावर भारतीय तिरंगा व महाराष्ट्राचा भगवा फडकाविला. 

अतिकठीण कांचनजुंगा
माउंट कांचनजुंगा शिखराची उंची  ८५८६ मीटर आहे. माउंट एव्हरेस्ट व माउंट के २ नंतर उंचीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर असून भारत आणि नेपाळच्या सीमेवर वसलेले आहे.  चढाईसाठी भारतीय बाजूचा मार्ग कांचनजुंगा व झेमू ग्लेशियरच्या बाजूने असून सध्या बंद आहे. त्यामुळे नेपाळच्या बाजुच्या मागार्ने यालुंग ग्लेशियरच्या मार्गे चढाई करावी लागते. बेसकॅम्प ते कॅम्प १ मार्ग तीव्र बर्फाळ रिज आहे. कॅम्प १ ते कॅम्प २ मार्ग: ब्लू आईस (टणक बर्फ ज्यावरून चालणे व चढाई करणे अत्यंत अवघड) तसेच १०० मीटर्सची बर्फाची ७० ते ८० अंश कोनातील उभी भिंत आहे. कॅम्प २ ते कॅम्प ३: दगडी भिंती, चढाई मोहिमेतील सर्वाधिक मृत्यू याच टप्प्यात होता. कॅम्प ३ ते कॅम्प ४: प्रचंड हिमभेगा, सतत हालचाल होणारा भाग आहे. कॅम्प ४ ते शिखरमाथा: कॅम्प ४ ते शिखरमाथा ते पुन्हा कॅम्प ४ हा प्रवास तब्बल २४ ते २७ तासांचा, अत्यंत थकवणारा, माउंट एव्हरेस्टवर याच टप्प्यांमध्ये चढाई- उतराईसाठी तुलनेने कमी म्हणजे १४ ते १७ तास लागतात

 

* कांचनजुंगावर चढाई करणारे गिर्यारोहक

आशिष माने :  यापूर्वी माउंट एव्हरेस्ट, माउंट ल्होत्से, माउंट मकालू व माउंट मनास्लु अशा चार अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणारा महाराष्ट्रातील एकमेव गिर्यारोहक. माउंट मकालू या जगातील पाचव्या उंच शिखरावर चढाई करणारा आशिष हा पहिला भारतीय नागरिक आहे. त्याच्या गिर्यारोहणातील कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती पुरस्कार.

प्रसाद जोशी :  २०१२ साली जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर मोहीम यशस्वी केली. २०१६ साली जगातील सातवे उंच शिखर माउंट धौलागिरीवर मोहीम यशस्वी करून माउंट धौलागिरी शिखर चढाई करणारे पहिले भारतीय नागरिक असा विक्रम प्रस्थापित केला.  

भूषण हर्षे :  २०१३ साली जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. भूषण हे उत्तम प्रस्तरारोहक आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय रॉक क्लायम्बिंग प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. सध्या ते गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक असून ते सध्या गिर्यारोहण क्षेत्रामध्ये पूर्णवेळ काम करतात.

रुपेश खोपडे : २०१२ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर यशस्वी मोहीम केली. कारगिल परिसरातील माउंट कून व माउंट नून या शिखरांवरील यशस्वी मोहिमांचे नेतृत्व त्यांनी केले आहे. नून व कून शिखरांवर मोहिमा यशस्वी करणारे ते महाराष्ट्रातील पहिले नागरिक आहेत.

आनंद माळी : २०१३ साली माउंट एव्हरेस्ट शिखर मोहीम यशस्वी केली. सध्या ते पुण्यातील विद्या व्हॅली शाळेमध्ये स्पोर्ट क्लायम्बिंग या गिर्यारोहणातील नव्या प्रकारचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. स्पोर्ट क्लायम्बिंग हा खेळ २०२० च्या टोकियो आॅलम्पिकमध्ये समाविष्ट आहे. 

कृष्णा ढोकळे : पिंपरी चिंचवड येथील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे कार्यरत असलेल्या कृष्णा ढोकळे यांनी २०१२ साली जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. 

डॉ. सुमित मांदळे :  २०१६ साली जगातील सहावे उंच शिखर माउंट च्यो ओयुवर यशस्वी चढाई केली आहे. व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेला सुमित गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट आॅफ माउंटनियरिंगमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून देखील काम करतो. 
विवेक शिवदे  : उत्तम पगाराची नौकरी सोडून सध्या विवेक पूर्णवेळ गियार्रोहण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तो गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट आॅफ माउंटनियरिंगमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून काम करतो. विवेकने अनेक गियार्रोहण मोहिमा यशस्वी केल्या असून, सी.बी १३ व माउंट कॅथेड्रल शिखर मोहिमांचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्याला आहे.

किरण साळस्तेकर : माउंट कून व हनुमान तिब्बा मोहिमांचा अनुभव असणारा किरण एक उत्तम गियार्रोहक आहे. सध्या तो खासगी बँकेत नोकरी करतो.

जितेंद्र गवारे : माउंट नून व ह्यमाउंट कॅथेड्रल शिखरांवर यशस्वी चढाई करणारे जितेंद्र हे अनुभवी गियार्रोहक आहेत.  
  

 

Web Title: wonderful.. courageous..! kanchenjunga trek successful in Strongly wind and snowful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.