‘शब्दप्रभूं’ची अमोघ वाणी ग्रंथरूपात उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 11:23 AM2019-07-19T11:23:09+5:302019-07-19T11:30:17+5:30
मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात, वक्तृत्वात आणि जीवनविषयक तत्वज्ञानात असल्याने ''त्यांना'' मोठा श्रोतृवर्ग मिळाला.
पुणे: ‘ बंधू भगिनींनो’ अशा प्रारंभापासून अंतापर्यंत रसिकमनाला खिळवून ठेवणारी ‘शब्दप्रभू’ प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अमोघ वाणीतील व्याख्यानं म्हणजे श्रोतृवर्गासाठी जणू पर्वणीच. त्यांची व्याख्यानं न ऐकलेला व्यक्ती अवघ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. चार तपाहून अधिक काळ आपल्या ओघवत्या शैली आणि विचारसंपन्न अशा वक्तृत्वाद्वारे समाजमन समृद्ध करणाऱ्या या तत्वचिंतकाची व्याख्यानं आता प्राचार्य प्रेमी आणि साहित्यरसिकांसाठी लवकरच ग्रंथरूपात उपलब्ध होणार आहेत. या माध्यमातून प्राचार्यांच्या श्रवणीय व्याख्यानांचा हा अक्षररूपी ठेवा कायमस्वरूपी पुस्तकदालनात संग्रही करून ठेवता येणार आहे.
अक्षरब्रह्म प्रकाशनाच्या वतीने ही पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चरित्रकार आणि या प्रकल्पाचे संपादक प्रा मिलिंद जोशी म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे वक्तृत्व हा मराठी वक्तृत्चाचा मानबिंदू आहे. महाराष्ट्राची श्रवण संस्कृती समृद्ध करण्यात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे संपूर्ण जीवन ही स्फूर्ती गाथा आहे. मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात, वक्तृत्वात आणि जीवनविषयक तत्वज्ञानात असल्याने त्यांना मोठा श्रोतृवर्ग मिळाला. त्यांच्या हयातीत त्यांच्या व्याख्यानाच्या कॅसेट ,सीडीज निघाल्या होत्या. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आजही मिळतो आहे. यु ट़यूब वर त्यांची व्याख्याने ऐकणाऱ्या तरुणाईची संख्या मोठी आहे. परदेशातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जसे बोलणे तसे लिहिणे आणि जसे लिहिणे तसे बोलणे या मुळे प्राचार्यांच्या लेखनाचा चाहता वर्ग ही खूप मोठा आहे. या साऱ्यांकडून तसेच संशोधक,अभ्यासक,आणि स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांच्याकडून भोसले यांची व्याख्याने ग्रंथ रुपात यावीत अशी मागणी सातत्याने सुरू होती. तिचा विचार करून हा प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले.
विविध विषयांचे अफाट वैविध्य, संदर्भांची श्रीमंती, प्राचार्यांचे तत्त्वचिंतन आणि अवघड विषय सोपे करून सांगण्याची त्यांची हातोटी या मुळे अनेकविध विषयांवरची त्यांची व्याख्याने हा मराठी माणसांसाठीचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. तो अक्षररुपात जतन करणेही तितकेच महत्वाचे आहे. म्हणून हा प्रकल्प हाती घेतला आहे. ‘बंधू भगिनींनो’ हेच नाव या ग्रंथालाही देण्यात येणार असून, थोरांची जीवनचरित्र, शिक्षण, साहित्य, सामाजिक,यासारख्या विषयांबरोबर विज्ञान आणि धर्म आणि आई या गाजलेल्या विषयांचा या ग्रंथात समावेश असेल. येत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी हे ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध होतील, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.